Coastal Road Tendernama
टेंडर न्यूज

Good News : कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला; 84 टक्के काम पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील कोस्टल रोड या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाची लगबग सुरू झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात चार लेनच्या एका मार्गिकेचे उद्‌घाटन करण्याची तयारी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान चार लेनची एक मार्गिका अंशतः वाहतुकीसाठी खुली करण्यात येत आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे ८४.०८ टक्के काम पूर्ण झाले. संपूर्ण कोस्टल रोड मे २०२४ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. कोस्टल रोड प्रकल्पावर सुमारे १४ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले. २०१९ पासून प्रत्यक्ष कामाला वेग आला आणि मार्च २०२० मध्ये कोरोना मुंबईत पसरला. परिणामी प्रकल्पाचे काम थंडावले. त्यानंतर २०२२ पासून प्रकल्पाला वेग आला आहे. चार हजार कामगार रात्रंदिवस काम करत असून थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यान एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्याचे नियोजन आहे; परंतु कोस्टल रोड प्रकल्पाचे समुद्रकिनारी काम सुरू असून साहित्य सामुग्रीची ने-आण करण्यासाठी वेळोवेळी वाहतूक थांबवावी लागेल, त्यामुळे चार लेनची एक मार्गिका वाहतुकीसाठी फक्त १२ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख मंतय्या स्वामी यांनी सांगितले. तसेच कोस्टल रोड प्रकल्पात विविध प्राधिकरणाच्या एकूण १९ परवानगी प्राप्त झाल्या असल्याचेही ते म्हणाले.

न्हावाशेवा सेतू सुरू झाल्यामुळे रायगडहून येणाऱ्या वाहनचालकांच्या वेळेत व इंधनाची बचत होणार आहे. आता न्हावाशेवा सेतूवरून थेट कोस्टल रोडहून वांद्रे व मरीन ड्राईव्हला जाता येणार आहे. 'अटल' सेतूवरून आल्यावर वरळी जे. के. कपूर चौकाजवळ कनेक्टर मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना वांद्रे किंवा मरीन ड्राइव्हच्या दिशेने जाता येणार आहे. या प्रकल्पामुळे इंधनाची ३४ टक्के; तर वेळेची ७० टक्के बचत होणार आहे. अथांग समुद्राचा आनंद लुटता यावा, यासाठी वरळी सी-फेस येथे लॅडस्केपिंग केले आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर वरळी ते प्रियदर्शनी पार्क १० ते १४ किमी अंतरावर लॅडस्केपिंग करण्यात येणार असून यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले. तसेच ७५ लाख चौरस फुटात होणार उद्याने, जॉगिंग ट्रॅक, शौचालये, खुले नाट्यगृह तयार केले जाणार आहे. तसेच येथे फुलपाखरू उद्यान साकारण्यात येणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असून वाहन चालकांसाठी ताशी ८० किमी वेग मर्यादा असणार आहे. तसेच कोस्टल रोड प्रकल्पात उद्यान, नाट्यगृह, सायकल ट्रॅक या ठिकाणी ये-जा करण्यासाठी एकूण २० अंडर पास वे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन मोठे बोगदे खोदण्यात आले आहेत. या दोन बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वाहनधारक व प्रवाशांना ये-जा करण्यासाठी एकूण १० छेद बोगदे खोदण्यात आले आहेत. यापैकी दोन बोगदे प्रवासी वाहनांसाठी; तर ८ बोगदे सेवा वाहनांसाठी असणार आहेत.

कोस्टल रोडच्या ठिकाणी भूमिगत पार्किंगची सुविधाही करण्यात आली आहे. अमर सन्स - २५६ वाहने, महालक्ष्मी मंदिर आणि हाजी अली - १,२०० वाहने, वरळी सी फेस येथे ४०० अशी पार्किंगचे क्षमता आहे. कोस्टल रोडचे बोगदे 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग' तंत्रज्ञानाने बनवण्यात आले असून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार आहेत. कंट्रोल रूम, स्वयंचलित नियंत्रण आणि पोलिस यासारख्या सुरक्षा यंत्रणांशी हे बोगदे जोडलेले असणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी १२ हजार ७२१ कोटींची तरतूद केली होती; परंतु टाटा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शिफारशीनुसार दोन पिलरमधील अंतर ६० मीटरवरून १२० मीटर करणे, जीएसटी १२ वरून १८ टक्क्यांवर गेल्याने प्रकल्प खर्चात एक हजार २६२ कोटींनी वाढ झाल्याने १३ हजार ९८३.८३ कोटींवर गेल्याचे कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख मंतय्या स्वामी यांनी सांगितले.