मुंबई (Mumabi) : संपूर्ण ग्रीनफिल्ड प्रकल्प असलेल्या नांदेड-जालना (Nanded-Jalna) या प्रस्तावित द्रुतगती मार्गासाठी २२०० हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. १४ हजार ५०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा संकल्प आहे. या मार्गासाठी अधिग्रहीत करण्यात येणारे भूसंपादन येत्या चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
नांदेड हे मराठवाड्यातील महत्त्वाचे जिल्ह्याचे ठिकाण असून, समृद्धी महामार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या नांदेड-जालना द्रुतगती मार्गामुळे या भागाचा सर्वांगीण आर्थिक विकास होणार आहे. जालना-नांदेड द्रुतगती मार्गाची लांबी १७९ किलो मीटर असून ८७ गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या ८७ पैकी ६७ गावांमधील संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. जालना-नांदेड द्रुतगती मार्गामुळे या दोन्ही शहरामधील २२६ किलो मीटरचे अंतर १७९.८ किलोमीटर एवढे कमी होणार आहे. तसेच मुंबई आणि नांदेडच्या दरम्यानचा १२ तासाचा प्रवासही अर्ध्यावर येणार आहे.
परभणी (९३ किलोमीटरचा पट्टा), जालना ६६.४६ किलो मीटर आणि नांदेड १९.८२ किलोमीटर या तिन्ही जिल्ह्यातील आठ तालुक्यातून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे. प्रस्तावित जालना-नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैद्राबादला जोडले जाणे अपेक्षित आहे. संपूर्ण ग्रीनफिल्ड प्रकल्प असलेल्या या द्रुतगती मार्गासाठी २२०० हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. आतापर्यंत ७७ टक्के जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी दिली. रस्ते बांधकामासाठी १४ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. ऑक्टोबर २०२४ पर्यंत हा द्रुतगती मार्ग बांधण्याचा संकल्प आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास उद्योग आणि व्यवसायांना चालना मिळून या पट्ट्यात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
पुढच्या महिन्यात या मार्गाच्या बांधकामा संदर्भातील टेंडर जारी करण्यात येणार आहे. या कामाला गती देण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी वेगाने काम करीत आहेत.