मुंबई (Mumbai) : सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यांतील नागरीकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा पुरवठा करण्याकरीता टेंडर (Tender) मागविण्यात आलेले आहे. या टेंडरमध्ये अत्यंत जाचक अटी व शर्थींचा समावेश करण्यात आलेला असून ठराविक जवळच्या तीन ठेकेदारांना (Contractors) या अटींचा लाभ व्हावा या हेतूने हे टेंडर बनविण्यात आले असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.
या टेंडरच्या अटी व शर्थींचे अवलोकन करण्यात आले असता त्या अटी व शर्थींचा लाभ ठराविक जवळच्या ३ कंत्राटदारांना कसा होईल याकरीता सर्वोतोपरी प्रयत्न संबंधित विभागाकडून चालविले जात असल्याची गंभीर बाब समोर आल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.
टेंडरमध्ये पुरवठा करावयाच्या एकूण किमतीच्या अधिक कामाचा अनुभव ठेकेदाराकडे असणे आवश्यक असतानाही विशिष्ठ ठेकेदारांना पात्र ठरवण्यासाठी फक्त २५ कोटी रुपये इतक्या कामाचा अनुभव मागविण्यात आलेला आहे.
या टेंडरअंतर्गत अन्नधान्य कडधान्य व इतर खाद्यपदार्थांचा पुरवठा करावयाचा आहे. त्यामुळे या वस्तूच्या पुरवठ्यांशी निगडीत कामकाजाचा अनुभव टेंडरमध्ये मागविणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात पुरवठा करावयाच्या वस्तू व टेंडरमध्ये ठेकेदारांकडे मागण्यात आलेला अनुभव यामध्ये कोणताही ताळमेळ लागत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे टेंडरमधील अटी या इतर ठेकेदारांना मारक ठरेल या हेतूने बनविण्यात आल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे.
या टेंडरमध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीमुळे हितसंबंध असलेले फक्त ३ कंत्राटदार साखळी पध्दतीने टेंडर सादर करून शासनाची फसवणूक करतील अशी शक्यता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वर्तवली आहे.
टेंडर तयार करताना केंद्रीय सतर्कता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये नमूद करण्यात आलेल्या बाबींकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच नियमांचे पालन न करता हे टेंडर तयार करण्यात आले आहे. या टेंडरमुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. तरी ही टेंडर प्रक्रिया सोपी व सुटसुटीत करणे आवश्यक आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त ठेकेदार स्पर्धात्मक दर प्राप्त करुन टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी होवू शकतील.
तरी या सूचनेचा प्राधान्याने विचार करून शासनाची फसवणूक होणार नाही, याकरीता आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, अशी विनंती वजा मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.