ambulance scam Tendernama
टेंडर न्यूज

Ambulance Scam : अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा नेमका कोणाच्या पुत्रासाठी?

टेंडरनामा ब्युरो

Ambulance Tender Scam मुंबई : राज्यात अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा (Ambulance Tender Scam) झाला आहे. या खरेदीत टेंडर (Tender) फुगवले गेले असून, तीन हजार कोटींचे काम दहा हजार कोटींवर नेले आहे. 30 टक्क्यांच्यावर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले आहे. हा अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT Enquiry) चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत केली आहे.

पुरवणी मागण्यांवर बोलताना त्यांनी 'महाराष्ट्र लुटा आणि गुजरातला वाटा', अशा शब्दांत राज्य सरकारचे वाभाडे काढले.

वडेट्टीवार म्हणाले की, अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हे सरकार रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खात आहे. सनदी अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांची बदली देखील झाली. निवडणूक फंडासाठी हा उद्योग सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघत असताना हा घोटाळा केला जात आहे. महाराष्ट्र लूटून साफ करण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारमधील अनेकांचा विरोध डावलून आणि प्रशासनावर दबाव आणून विशिष्ट आणि ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून ॲम्ब्युलन्ससाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप आहे.

मर्जीतील ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी तिप्पट दरवाढीचे तब्बल १० हजार कोटींचे रुग्णवाहिका टेंडर 'सुमित', स्पेनस्थित 'एसएसजी' आणि 'बीव्हीजी' कंपनीला बहाल करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधीच आरोग्य विभागाने टेंडरची वर्क ऑर्डर ठेकेदारांना दिली आहे. राज्य सरकारमधील अनेकांचा विरोध डावलून आणि प्रशासनावर दबाव आणून विशिष्ट आणि ब्लॅकलिस्टेड ठेकेदारांना डोळ्यांसमोर ठेवून ही टेंडर प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

'टेंडरनामा'ने अगदी सुरवातीपासून हे जम्बो टेंडर पिंपरी चिंचवड येथील सुमित फॅसिलिटीज या कंपनीला मिळावे यासाठी सत्ताधाऱ्यांचे कसे प्रयत्न होते, याचा पर्दाफाश केला आहे. तसेच टेंडरमधील त्रुटी, अनियमितताही वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे.