Aditya Thackeray Tendernama
टेंडर न्यूज

Aditya Thackeray : मुंबईत कचऱ्याचे ढीग; सरकार बिल्डर, ठेकेदारांच्या सरबराईत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून साफसफाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मुंबई महापालिका कुठल्याच विभागात नियमितपणे कचरा गोळा करण्याचे काम करत नाही. मुंबईत कचऱ्याचे ढीग साचत असून अस्वच्छता निर्माण झाली आहे. पण, दुसरीकडे मुंबईकरांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करत राज्य सरकार बिल्डर आणि ठेकेदारांच्या दिमतीत व्यस्त आहे, अशी टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray यांनी केली आहे.

मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना खरमरीत पत्र लिहून मुंबईकरांच्या तक्रारी सोडवण्याची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी संपल्यामुळे महापालिकेत गेले वर्षभर लोकप्रतिनिधी नाहीत. त्याचबरोबर 15 सहाय्यक आयुक्तांच्या जागा रिक्त आहेत. अशा परिस्थितीत मुंबईकरांनी कुठे तक्रार करायची, सोशल मीडियावरील तक्रारींना कॉपी पेस्ट उत्तरे मिळतील, पण प्रत्यक्षात कोणतेही काम होताना दिसत नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईत अनेक ठिकाणी गेले काही महिने कचरा वेळेवर उचलला जात नाही. सर्वच वॉर्डांमधील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे खरे कारण काय आहे. जसे सध्या मुंबई महापालिका राज्य सरकारच्या बिल्डर आणि ठेकेदार मित्रांसाठी काम करते तसे कृपया मुंबईकरांच्या हितासाठी काम करा, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यावर केली आहे.