मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराच्या (Contractor) सुनावणीत नेमके काय झाले, मुंबईकरांना वेठीला धरणाऱ्या या कंत्राटदारावर कारवाई होणार की नाही, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना केला आहे.
तसेच मुंबईतील मेगा रस्ते घोटाळ्यात एक हजार कोटींची कामे घेतलेल्या दुसऱ्या कंत्राटदारांबाबत मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय असेल, हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. हा कंत्राटदार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे असे समजते. चिपळूणमध्ये नुकत्याच कोसळलेल्या पुलाचे काम देखील या कंत्राटदाराकडेच आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कंत्राट पाच कंत्राटदारांना दिले आहे. यात दोन वर्षांत मुंबईच्या रस्त्यांचे पूर्णपणे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. मात्र, दहा महिने झाले तरी यातील बहुतांश रस्त्यांची कामे अर्धवट आहेत तर काही ठिकाणी कामे सुरूच झालेली नाही. रस्त्यांची कामे रखडल्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने रखडलेल्या कामांबाबत कंत्राटदाराला नोटीस बजावली होती. या नोटिसीमध्ये कंत्राटदाराची सर्व अनामत रक्कम जप्त करण्याचा आणि काम काढून घेण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याबाबत शुक्रवारी मुंबई महापालिकेत आयुक्तांसमोर सुनावणी झाली.
मुंबई महापालिकेने 9 ऑक्टोबरला नोटीस पाठवून या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर कंत्राटदाराकडून मुंबई महापालिकेला उत्तर प्राप्त झाल्यानंतर यातून मुंबई महापालिकेचे समाधान न झाल्याने कंत्राटदाराला सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले होते.
आदित्य ठाकरे यांचे आयुक्तांना सवाल!
१) मुख्यमंत्र्यांचा मित्र असलेल्या या कंत्राटदाराला कंत्राट घेऊनही काम न करण्याबद्दल ब्लॅकलिस्ट करणार का, की खोके सरकारशी झालेल्या तडजोडीनुसार फुटकळ कारणांच्या आधारे या कंत्रादाराला बजावलेली नोटीस मागे घेणार?
२) मुंबईतील मेगा रस्ते घोटाळ्यात एक हजार कोटींची कामे घेतलेल्या दुसऱ्या कंत्राटदारांबाबत मुंबई महानगरपालिकेची भूमिका काय असेल, हे जाणून घेण्यास देखील मी उत्सुक आहे.
३) हा कंत्राटदार घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे असे समजते. चिपळूणमध्ये नुकत्याच कोसळलेल्या पुलाचे कामदेखील या कंत्राटदाराकडेच आहे.
प्राप्तिकर विभागाची छापेमारी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा १५० ते २०० मीटरचा मोठा भाग कोसळला. उल्हासनगर येथील 'ईगल इन्फ्रा' कंपनीकडे या पुलाच्या कामाचे टेंडर आहे. आयकर विभागाने नुकतीच उल्हासनगरातील ईगल इन्फ्रा लिमिटेड, रिजेन्सी प्रायव्हेट लिमिटेड आणि कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या तीन मोठ्या कंपन्यांच्या संचालक आणि भागीदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर ही छापेमारी केली.