Adani Tendernama
टेंडर न्यूज

'ते' टेंडरही 'अदानी'लाच!; तब्बल 25 वर्षे कंपनी राज्याला वीज पुरवणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यात 6600 मेगावॅट वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती. हे टेंडर अदानी समूहाने जिंकले आहे. पुढील 25 वर्षे ही वीज अदानी समुहाकडून राज्याला पुरवठा करण्यात येणार आहे. अदानी समुहाने या टेंडर प्रक्रियेत प्रति युनिट 4.08 रुपये अंदाजित दर दिला होता. त्यामुळे जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरेंट पॉवर या दोन मोठ्या कंपन्या टेंडर प्रक्रियेतून बाद झाल्या आहेत.

अदानी ग्रीन एनर्जीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड सोबत वीज खरेदी करार केला आहे. या करारांतर्गत, कंपनी गुजरातमधील खवडा रिन्युएबल एनर्जी पार्कमधून महाराष्ट्र राज्याला 5 गिगावॅट (5000 मेगावॅट) सौर ऊर्जा पुरवेल. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात हा एनर्जी पार्क आहे. तसेच अदानी पॉवर लिमिटेडने (एपीएल) नवीन 1600 मेगावॅट अल्ट्रा-सुपरक्रिटिकल थर्मलमधून महाराष्ट्र राज्याला 1496 मेगावॅट औष्णिक वीज पुरवठा करण्यासाठी एमएसईडीसीएल सोबत करार केला आहे. म्हणजेच अदानी समूह महावितरणला एकूण 6600 मेगावॅट वीज पुरवणार आहे.

यासंदर्भात, अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी म्हणाले की, अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे राज्यांची वाढती ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि अक्षय ऊर्जा वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी एमएसईडीसीएल सोबत सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देणे हे आमचे ध्येय आहे. देशाच्या ऊर्जा स्वातंत्र्यासाठी आणि शाश्वत भविष्याच्या उभारणीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. यावरून काँग्रेसने महायुतीवर निशाणा साधला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी, महायुती सरकारच अदानींवर कृपादृष्टी असल्याची टीका केली आहे. तसेच, राज्यातील महायुती सरकार दारूण पराभवाकडे झुकते आहे, त्यामुळे शेवटच्या घटकेत ते हेच करणार, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमांचे पालन करत अदानी समूहाने टेंडर मिळवले असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, "नुसती टीका टिप्पणी करण्याआधी टीका करणार्‍यांनी काही चुकीचे झाले असेल तर ते समोर आणावे. या टेंडरमध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक डावलल्या गेल्या, हे त्यांनी दाखवावं. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या कंपनीबद्दल एखाद्या पक्षाला आकस असेल किंवा त्यांची नाराजी असेल तर त्यांना ती नाराजी बोलून दाखवण्याचा अधिकार आहे. असा करण्याचा अधिकार हा प्रत्येक पक्षाला आहे, पण पुरावेही हवेत," असे म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.