Adani Group Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : 'त्या' मोक्याच्या 29 एकर जागेचा विकास अदानीच करणार; 'एलॲण्डटी'ला टाकले मागे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकास टेंडरपाठोपाठ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वांद्रे रेक्लमेशन येथील मोक्याच्या ठिकाणच्या २९ एकर जागेचा विकास अदानी समूह करणार आहे. टेंडर प्रक्रियेत अदानी समूहाने सर्वाधिक बोली लावून 'एल.ॲण्ड टी.'ला मागे टाकले आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतूलगत सात एकर जागेवर एमएसआरडीसीचे मुख्यालय आहे. मुख्यालयासमोर कास्टिंग यार्डची २२ एकर जागा आहे. दोन्ही मिळून २९ एकर जागेचा विकास करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एमएसआरडीसी येथील मोकळ्या भूखंडाचा वापर कास्टिंग यार्ड म्हणून करीत होती. आता या जागेवर निवासी वा अनिवासी उत्तुंग इमारत संयुक्त भागीदारीतून बांधण्यात येणार आहे. एमएसआरडीसीकडून कोट्यवधीचे रस्ते विकास प्रकल्प राबविले जात आहेत. अशावेळी निधीची चणचण कमी करण्यासाठी या जागेचा विकास करून त्यातून आठ हजार कोटींहून अधिकचा महसूल मिळविण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.

या २९ एकर जागेच्या विकासासाठी एमएसआरडीसीने जानेवारीत टेंडर प्रसिद्ध केले. यात अदानी, एल.ॲण्ड टी. तसेच मायफेअर या कंपन्यांनी टेक्निकल टेंडर भरले होते. याची छाननी करून एमएसआरडीसीने कमर्शियल टेंडर खुली केली. यात अदानी आणि एल.अँड टी.चे टेंडर पात्र ठरले आहे. त्यातही अदानीने सार्वधिक बोली लावली आहे. एमएसआरडीसीने लावलेल्या बोलीपेक्षा अदानीने २२.७ टक्क्यांनी अधिक बोली लावली आहे. तर एल.अँड टी.ने बोलीच्या १८ टक्के अधिक बोली लावली आहे. अदानीची बोली सर्वाधिक असल्याने आता हे कंत्राट त्यांनाच मिळण्याचीच शक्यता आहे. एमएसआरडीसी आणि कंत्राटदार संयुक्त भागीदारी पद्धतीने प्रकल्प राबविणार आहेत. प्रकल्पातून जो नफा मिळेल त्यातील २३ टक्के नफा एमएसआरडीसीला मिळणार असून उर्वरित नफ्यातून खर्च वगळून शिल्लक नफा कंत्राटदाराला मिळेल, असे एमएसआरडीसीने म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यात एमएसआरडीसीच्या मुख्यालयाच्या सात एकर जागेचा तर दुसऱ्या टप्प्यात कास्टिंग यार्डच्या २२ एकर जागेचा पुनर्विकास करण्यात येईल. वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूच्या कामासाठी कास्टिंग यार्डचा वापर म्हणून केला जात आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी चार वर्षे लागणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास सुरू होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. एमएसआरडीसीचे मुख्यालय जमीनदोस्त होऊन लवकरच पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होईल. या जागेवर बांधल्या जाणाऱ्या इमारतीत ५० हजार चौरस फुटाचे कार्यालय एमएसआरडीसीला मिळणार आहे.