Lockdown Tendernama
टेंडर न्यूज

लॉकडाऊनचा धक्कादायक परिणाम; 67 टक्क्यांवर बेरोजगारीची...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कोरोनाचा (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केल्याने राज्यातील तब्बल ६७ टक्के लोकांचा रोजगार गेल्याची धक्कादायक आकडेवारी राज्य सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने (Directorate of Economics and Statistics) केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. लॉकडाऊनचे परिणाम ऐवढे मोठे होते की अनेकांना रोजगार बदलावे लागले, तर अनेकांच्या रोजगारांवर कुऱ्हाड कोसळल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जगात थैमान घातले. कोरोना संसर्गाचा भारतावरही मोठा परिणाम झाला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. हातावर पोट असलेले, मोल मजुरी करणाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. उद्योग क्षेत्रावरही लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला. लॉकडाऊनच्या काळात अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले.

उद्योग क्षेत्रालाही लॉकडाऊनचा मोठा फटका सहन करावा लागला. उद्योग क्षेत्राचे मोठे आर्थिक नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. त्यामुळे लोकांना रोजगारापासून मुकावे लागले. ग्रामीण भागातील सुमारे ३२.४ टक्के तर नागरी भागातील ३४ टक्के व्यक्तींनी लॉकडाऊन नंतर आपला पहिल्याच व्यवसाय कायम ठेवला असला तरी सरासरी ६७ टक्के व्यक्तींना आपला रोजगार बदलण्याची नामुष्की ओढविल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे लोकांवर झालेल्या परिणामाची माहिती गोळा करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. राज्यात ग्रामीण भागातील ३१०, तर नागरी भागातील ४९० अर्बन फ्रेम सर्वे घटक अशा ८०० घटकांमध्ये पाहणी घेण्यात आली.

महत्त्वाचे मद्दे...
- ग्रामीण भागातील सुमारे २९.८ टक्के, तर नागरी भागातील ३९.१ टक्के व्यक्तींचे लॉकडाऊन दरम्यान काम तात्पुरते बंद होते. त्याकाळात काहींना अंशतः वेतन मिळाले, अंशतः मजुरी मिळाल्याचे नोंदविले आहे.

- ग्रामीण भागातील सुमारे ४७.१ टक्के व नागरी भागातील १९.८ टक्के व्यक्तींनी लॉकडाऊनच्या काळात काम पूर्णपणे बंद होते, तसेच वेतन, मजुरी प्राप्त झाली नसल्याचे म्हटले आहे.

असे झाले सर्वेक्षण...

- पाहणी केलेल्या ग्रामीण कुटुंबाची संख्या : ६२००

- पाहणी केलेल्या श्रीमंत कुटुंबाची संख्या : ९८००

- पाहणी केलेल्या एकूण कुटुंबांची संख्या : १६०००

- सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ग्रामीण व्यक्तींची संख्या : २६८६७

- सर्वेक्षणात सहभागी झालेल्या शहरी व्यक्तींची संख्या : ३९८८१

- सर्वेक्षणात सहभागी झालल्या व्यक्तींची एकूण संख्या : 66748