26/11 mumbai attack taj Tendernama
टेंडर न्यूज

26/11 Mumbai Attack : मुंबई खरंच सुरक्षित आहे का? सागरी सुरक्षेसाठी...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला रविवारी (ता. २६) १५ वर्षे पूर्ण झाली. मुंबईला लाभलेल्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांकडे पुरेशा बोटी नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या सागरी किनारा सुरक्षेसाठी राज्य सरकारने ५१ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

एकूण २८ नवीन बोटी खरेदी केल्या जाणार आहेत, यापैकी १० नवीन बोटी पहिल्या टप्प्यात खरेदी केल्या जातील. तसेच ५ वर्षांसाठी ५ इंटरमीडिएट सपोर्ट व्हेईकल्स भाडेत्तवावर घेण्यात येणार आहेत. लवकरच त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

राज्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाय योजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलिस गस्त नौका आहेत.

सध्या राज्यात ३० पोलिस बोटी कार्यरत आहेत आणि त्या राज्याच्या किनारपट्टीवर नियमितपणे गस्त घालत आहेत. याशिवाय राज्याने २५ ट्रॉलर भाड्याने घेतले असून, हे सर्व ट्रॉलर्स सातही सागरी पोलिस घटकांमार्फत सागरी किनारी भागात गस्त घालण्यासाठी वापरले जातात, असे गृह विभागाने म्हटले आहे.

सध्या असलेल्या बोटींचे आधुनिकीकरण करण्याच्या अनुषंगाने मुंबई पोलिस दलाकडील बोट - मुंबई २ चे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तसेच या नौकेच्या चाचणीनंतर तिचा वापर सागरी गस्तीसाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच मार्गावर इतर बोटींना कार्यान्वित करण्यात येणार आहे.