मुंबई (Mumbai) : एमएमआरडीएचे (MMRDA) एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. दरवर्षी 25 हजार कोटींची कामे होतील, अशी योजना तयार करण्यात आली आहे. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) या गेम चेंजर प्रकल्पाचा पहिला टप्पा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत, हा महामार्ग दिल्ली - मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडॉर आणि जेएनपीटीशी जोडला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आर्किटेक्चर, कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रदर्शनात ग्लोबल ब्रँड्सचाही समावेश आहे. आजही मुंबई आणि महाराष्ट्र या ब्रँडसाठी एक प्रकारे मॅग्नेट आहेत, कारण आज महाराष्ट्रात मोठ्या पायाभूत सुविधांचे काम सुरू होत आहे. हे ब्रँड केवळ व्यवसायासाठी येत नाहीत. त्यांच्या जागतिक दर्जाच्या कामांची खरी दाद इथेच मिळते. राज्य सरकारच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रिअल इस्टेट क्षेत्र शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. त्यामुळेच या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सुविधा दिल्या आहेत. आमची पंचसूत्री महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 2 लाख कोटींचे 225 हून अधिक प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम देखील 84 टक्के पूर्ण झाले असून, नरीमन पॉईंटहून वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहचू शकणार आहोत. रायगड जिल्ह्यातही ग्रोथ सेंटर बांधण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. आम्ही इन्फ्राला प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही करीत आहोत, असे शिंदे म्हणाले.
पुढील 20 वर्षांसाठी एमएमआर प्रादेशिक योजना आणि एमएमआर वाहतूक योजना तयार केली आहे. राज्य सरकारने एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे, असेही ते म्हणाले.
सरकार बदलले आहे, आता मुंबईचे रुपही बदलणार आहे. पुढील दोन अडीच वर्षांत मुंबईतील रस्ते पूर्णपणे कॉँक्रिटचे करण्यात येतील. रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही. आयकॉनिक इमारती उभारण्यात आल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात 5000 किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते तयार करण्यात येणार आहेत. मुंबई - गोवा ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाचा डीपीआर तयार झाला आहे. तसेच क्लस्टर विकासाला गती देण्यात येत असून, मुंबई झोपडीमुक्त केली जाईल. प्रीमियम, मुद्रांक कर, यूनिफाईड विकास नियंत्रण नियमावली या माध्यमातून विकासकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.