मुंबई (Mumbai) : ठाण्यातील समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. महामार्गावर बांधकाम सुरू असताना क्रेनचा गर्डर लाँचर पडल्याने १७ मजुरांचा चिरडून मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. अजूनही काही मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी शोध बचाव कार्य सुरू आहे.
गर्डर लाँचर मशीन ही गॅन्ट्री क्रेन आहे, ही क्रेन पुलाच्या बांधकामात वापरली जाते. हायवे आणि हाय-स्पीड रेल्वे ब्रीज बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रीकास्ट बॉक्स गर्डरचा वापर करण्यास या क्रेनचा वापर केला जातो. रात्री उशिरा या मशिनच्या सहाय्याने बॉक्स गर्डर बसविण्याचे काम सुरू असताना अचानक गर्डर लाँचर खाली पडल्याने मजूर गाडले गेले. यासंदर्भात ठाण्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, ज्या महामार्गावर हा अपघात झाला त्या ठिकाणी 23 मजूर काम करत होते. घटनेची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मालेगाव येथून अपघात स्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याआधीच हा भयंकर अपघात घडल्यामुळे यंत्रणांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
ठाणे आपत्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शहापूर तालुक्यातील सातगाव पूल, सरल आंबेगाव येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. तयार उड्डाणपुलाचा भाग उचलून क्रेनच्या सहाय्याने पिलरवर बसविण्याचे काम सुरू असताना अचानक गर्डर लाँचर खाली पडला. गर्डर लाँचर खाली पडल्याने घटनास्थळी गोंधळ उडाला. तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी तातडीने पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस अधीक्षक स्वत: बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले.
ठाणे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीमध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला आहे, जे मजूर होते आणि काम करत होते. याशिवाय तीन मजूर जखमी झाले आहेत. या घटनेत काही मजूर अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी हजर आहेत. मुंबई आणि नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांब आहे. नागपूर, वाशिम, वर्धा, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, अमरावती, जालना, नाशिक आणि ठाणे अशा १० जिल्ह्यांतून हा महामार्ग जातो. समृद्धी महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरु आहे. महामार्गाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे काम यावर्षी डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडे सांगितले आहे.
शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत
शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.