Yevatmal Tendernama
विदर्भ

Yavatmal News : यवतमाळ शहरातील 98 धोकादायक इमारतींवर नगरपालिका काय कारवाई करणार?

टेंडरनामा ब्युरो

Yavatmal News यवतमाळ : मुंबईच्या घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग अपघातानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर नगरपालिकेतर्फे प्रशासनाला अवैध होर्डिंग आणि धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. म्हणूनच नगरपालिकेकडून शहरात मान्सूनपूर्व उपाययोजना राबविल्या जात आहेत. या अंतर्गतच धोकादायक इमारती आणि पूरबाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.  

ज्यामध्ये 98 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे. पालिकेच्या नगर रचना विभागाकडून याबाबतची माहिती घेण्यात आली. आता अशा इमारती व घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना नोटीस बजावली जात आहे. पण अद्यापपर्यंत धोकादायक इमरतीत राहणाऱ्या लोकांसाठी स्थलांतरणाची व्यवस्था केली गेली नाही.

नदी-नाल्यांची केली जात आहे सफाई 

नगरपालिका प्रशासनाकडून शहराच्या सखल भागात जमा होणारे पाणी वाहून जावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातील सांडपाण्यासाठी पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या प्रमुख नाल्यांची सफाई केली जात आहे. तलाव फैल परिसरातील नागमंदिर नाला येथेही साफसफाई करण्यात आली आहे. उमरसरा, मुलकी, आमराई, आमराईपुरा या परिसरातील नाले सफाईला गती आली आहे.

पूरस्थिती लक्षात घेता आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे. वाघाडी परिसरातील नदी खोलीकरणाचे कामही सुरू होईल, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

येथे झाले इमारतीचे सर्वेक्षण

बसस्थानक चौकातील सिमेंट रोडच्या वरची बाजू आणि खालची बाजू अशा पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. बसस्थानकाच्या बाजूने असलेल्या परिसरात 52 घरे धोकादायक स्थितीत आहेत. तर मुख्य बाजारपेठ असणाऱ्या परिसरात 466 इमारती व घरे धोकादायक असल्याचे आढळले आहे. या सर्व घर मालकांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याकडून घर चांगल्या स्थितिमध्ये असल्याचे प्रमाणपत्र पालिका प्रशासनाने मागितले आहे.

मलब्यामुळे धोका

अमराईपुरा येथे पुलाचे बांधकाम करण्यात आले. यात कंत्राटदाराने खोदकामात निघालेला मलबा नाल्यातीलच काही भागात डम्प केला आहे. यामुळे पावसाळ्याच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन परिसरातील घरांना धोका होऊ शकतो, अशी स्थिती आहे. पूल बांधकाम करणारा कंत्राटदार काम करून निघून गेला. आता तेथे जवळपास 20 टिप्पर इतका मलबा पडून आहे. हा मलबा उचलायचा कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी हा मलबा काढला नाही तर येथे पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.