Coal  Tendernama
विदर्भ

Yavatmal News : 'त्या' कोल वॉशरीकडून 10 कोटींची हेराफेरी, संचालकावर का दाखल झाला गुन्हा?

टेंडरनामा ब्युरो

Yavatmal News यवतमाळ : मे. बी. एस. इस्पात लिमिटेड कंपनी व इंडो युनिक फ्लेम लिमिटेडमधील व्यावसायिक वाद शिगेला पोहोचला आहे.

कोळसा खाणीतून धुण्यासाठी कोल वॉशरीत पाठविलेल्या 25 हजार टन कोळशाची परस्पर विल्हेवाट लावून 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वणी येथील इंडो युनिक फ्लेम कोल वॉशरीचे संचालक विपुल चौधरी यांच्याविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मे. बी. एस. इस्पात लिमिटेडचे (चिनोरा, ता. वरोरा) उपाध्यक्ष सागर रामचंद्र कासनगोद्ववार यांनी 6 मे रोजी याबाबत वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तक्रारीनुसार बी. एस. इस्पात कंपनी आणि इंडो युनिक फ्लेम कोल वॉशरी या दोघांमध्ये 5 मार्च 2022 रोजी 41251.14 मेट्रिक टन कोळसा वॉश करून देण्याचा लेखी करार झाला होता. करारानुसार 6 मार्च 2022 ते 19 जून 2022 पर्यंत बी. एस. इस्पात कंपनीच्या मार्की मांगली-3 मुकुटबन या कोळसा खाणींमधून 41251.14  मेट्रिक टन कोळसा वॉश करण्यासाठी वणी येथील भालर रोडवर असलेल्या इंडो युनिक कोल वॉशरी, येथे पाठवण्यात आला.

इंडो युनिक फ्लेम लिमिटेड कोल वॉशरीत पाठविलेल्या कोळशापैकी 16219.37 मेट्रिक टन कोळसा 9 मार्च  2022 ते 2 मार्च 2023 पावेतो कोळसा वॉश करून बी. एस. इस्पात कंपनीत परत करण्यात आला. त्यानंतर या कोल वॉशरीकडून उर्वरित कोळसा परत करण्यात आला नाही. त्यामुळे सागर कासनगोद्ववार यांनी वॉशरीचे संचालक विपुल चौधरी यांना वारंवार कोळसा परत मागितला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

25 हजार मेट्रिक टन कोळसा अडकवला

विपुल चौधरी यांना विचारणा केली असता, त्यांनी वर्ष 2015 मध्ये कोल वॉशरीमधून वॉश केलेला कोळसा वेळेवर घेऊन गेले नसल्याने जागेचा किराया व त्यावरील व्याजाची रक्कम बी. एस. इस्पात कंपनीकडे थकबाकी असल्याचे उत्तर दिले. बऱ्याचवेळा विनंती केल्यानंतरही विपुल चौधरी यांनी कोल वॉशसाठी जमा केलेल्या कोळशापैकी उर्वरित 25,031.77 मेट्रिक टन कोळसा परत केला नाही. तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी विपुल चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.