Mayo Hospital Nagpur (IGGMCH) Tendernama
विदर्भ

Nagpur : मेडिकलमध्ये महिला वसतीगृहाचे बांधकाम रखडले, कारण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) निवासी डॉक्टर्स आणि पदविधारकांसाठी नवीन वसतीगृह बांधण्याची घोषणा करण्यात आली असून, निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, वृक्ष तोडण्याची परवानगी न मिळाल्याने वसतीगृहाचे बांधकाम रखडले. मुलींना नर्सिंग होस्टेलमध्ये राहावे लागत आहे. आणखी किती दिवस नव्या वसतीगृहाची प्रतिक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मेडिकल आशिया खंडातील एक नामांकित रुग्णालय म्हणून ख्यातीप्राप्त आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकांची निवासी डॉक्टरांची संख्या असून पदवीधारक विद्याथ्र्यांची संख्या एक हजार एवढी असते. निवासी डॉक्टरांसह येथील वसतिगृह अपूरे पडत आहे.

मेडिकलमध्ये तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाचे सुमारे 620 निवासी

डॉक्टर येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला आहेत. 24 तास रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेल्या पहिल्या वर्षाला आलेल्या निवासी डॉक्टरांच्या नशिबी भुतबंगल्यासारखे बंगले आले आहेत. एका बंगल्यात 20 ते 25 निवासी डॉक्टरांचा निवास आहे. मुलासाठी वसतिगृहात खोल्यांची संख्या बऱ्यापैकी आहे, परंतु महिला निवासी डॉक्टरांना नर्सिंग होस्टेलमध्ये ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वसतिगृहाचे बांधकाम कधी होईल हे सांगता येत नाही.

निधी मंजूर तरीही काम सुरु होईना

मेडिकलमध्ये दरवर्षी 1200 विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी पन्नास टक्के मुलींची संख्या असते. एकूण विद्यार्थ्यांच्या 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांना वसतिगृह कमी पडत आहे. त्यांना बाहेर राहावे लागते. ही बाब लक्षात घेत विद्यमान अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पुरवणी मागण्यांमध्ये मुलींसाठी 450 खोल्यांच्या वसतिगृहासाठी प्रस्ताव सादर केला. 62 कोटीचा निधी मंजूर झाला, मात्र अद्यापही वृक्ष कापण्याची परवानगी न मिळाल्याने वसतिगृहाचे काम रखडले आहे.