नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) मोवाड नगरपरिषद संपूर्ण महाराष्ट्रात दिमाखत मिरवत होती. झाडून सगळी सुबत्ता नगरीत होती. मात्र १९९१ च्या महापुरानंतर संपूर्ण गावच उद्ध्वस्त झाले. ही मोवाड नगर परिषद आज १५५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. मोवाडला पुन्हा गतवैभव मिळवण्यासाठी मोवाडवासीयांनी ‘स्मार्ट मोवाड'चा संकल्प केला आहे.
इंग्रजांच्या काळात महाराष्ट्रातील दुसरी नगरपरिषद नरखेड तालुक्यातील मोवाड येथे स्थापन झाली होती. १७ मे १८६७ ला नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. १९१६ ला नगरपरिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. यावेळी जनतेतून पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान त्र्यंबक व्यंकटराव जोशी यांना मिळाला होता. यानंतर अनेक नगराध्यक्ष या नगरपरिषदेने पाहिले.
अगदी वर्धा नदीच्या काठावर बसलेल्या या नगरपरिषदेची खरी सुरवात झोपडीवजा इमारतीतून झाली. ३० जुलै १९९१ ला आलेल्या महापुरामुळे मात्र यांचे सर्वच गतवैभव हिरावून घेतले. घरांसह नगरपरिषदेचे सुध्दा पुनर्वसन झाले. नवीन इमारत मिळाली, पण गतवैभव या नगरीला अद्याप मिळू शकले नाही. एका प्रलयकारी पुराने यांचे सर्वस्वच हिरावून नेले. त्याला ३१ वर्षे पूर्ण झाली. परंतु येथील परिस्थिती जशी होती तशीच आहे. फक्त माणसे बदलली. समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पुनर्वसन व पुरामुळे जवळपास १००० एकर शेती निकृष्ट झाली आहे. त्यामुळे मजुरांच्या हातांनाही काम मिळत नाहीत.
स्थापना दिनी मोवाडवासीयांनी वर्धानदीवर सिंचनासाठी मोठ्या बंधाऱ्याची निर्मिती, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शहरात कोल्डस्टोरेज व वेअरहाऊस, विज्ञान, एम. ए. व बी. कॉमचे वर्ग, नागरिकांना फिल्टर पाणी पिण्यासाठी सुविधा, जीर्ण शाळेची इमारत नव्याने तयार करणार, नवीन वस्ती ते जुनी वस्ती जाणारा रस्ता, आरोग्यासाठी १०० बेडचे ग्रामीण रुग्णालय या सुविधा निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.