Coal  Tendernama
विदर्भ

मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या कोल वॉशरीला अभय कुणाचे?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कोल वॉशरीच्या प्रदूषणामुळे पारशिवनी तालुक्यातील वराडा मौजा एसंबा येथील सुमारे सहाशे एकरातील उभ्या पिकांचा कोळसा झाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वॉशरी बंद करण्याची नोटीस दिल्यानंतर पंधराच दिवसात ती पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहकार्य करीत नसल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

गोंडेगाव खदानीतील कोळसा एसंबा येथे वॉश केला जातो. वर्षभरापासून सुरू असलेल्या कोळश्याची वाहतुकीने सर्व पिके काळी पडली आहे. मोसंबी, कापूस, भाजीपाला आदी पिके काळे ठिक्कार पडली आहेत. दुसरीकडे बोरिंगने पाण्याचा उपसा केला जात आहे. वॉशरीचे पाणी जमिनीत मुरत असल्याने भूगर्भातील पाणीसुद्धा प्रदूषित झाले आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने २० मे २२ ला वॉशरी बंद करण्याची नोटीस बजावली होती. सोबतच एमएसईबीला वीज पुरवठा बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र पंधरा दिवसानंतर प्रदूषण मंडळाने काही शर्ती टाकून पुन्हा वॉशरी सुरू करण्याची परवानगी दिली. त्या शर्ती पूर्ण केल्या की नाही याची खातरजमा अद्याप करण्यात आलेली नाही.

मोठ्या प्रमाणात वायू आणि जल प्रदूषण होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी कशी दिली याचा जाब विचारण्यासाठी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबरला शेतकरी मंडळासमोर धडक आंदोलन करणार आहे. मंडळाच्या भूमिकेचा निषेधसुद्धा नोंदवण्यात येणार आहे.

कोल वॉशरीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना पीकपाण्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नाही. स्वतःच्या हितासाठी प्रशांत पवार काही शेतकऱ्यांना उसकावत आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही. आरोप करणे आणि नंतर तडजोडी करणे ही पवार यांच्या कामाची पद्धतच आहे.
- आमदार आशिष जयस्वाल, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष

एका खाजगी कोल वॉशरीला वाचवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पुढाकार घेत आहेत. मोजक्याच शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. ती देताना कुठलीही नैसर्गिक आपत्ती झाली नसल्याने शासनाचे निकष लावण्यात आले आहे. वेळ मारून नेण्यासाठी अधिकारी बैठकांचा खेळ करीत आहेत.
- प्रशांत पवार, अध्यक्ष, जय जवान जय किसान संघटना