PWD Tendernama
विदर्भ

Gondia: उड्डाणपुलाच्या कामाचे खोटे टेंडर काढणारे 'ते' अधिकारी कोण?

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : गोंदिया शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याने त्याला पाडून नवीन उड्डाण पूल (Flyover) तयार करण्यात येणार आहे. मात्र, या उड्डाण पुलाच्या बांधकामाचे खोटे टेंडर 7 जून रोजी प्रकाशित करून शहरवासीयांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. तसेच पुलाच्या बांधकामाचे ई-टेंडर अद्यापही निघाली नसून, ती 30 जूनपर्यंत निघणार असल्याचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यासाठी 2019च्या अर्थसंकल्पात 80 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, 2023 पर्यंत उड्डाणपूल पाडण्याचे काम पूर्ण न झाल्याने ही प्रक्रिया लांबणीवर गेली होती.

माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी उड्डाणपुलाच्या बांधकामासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 25 मे रोजी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी 10 दिवसांत नवीन पूल बांधकामाचे टेंडर काढण्याचे आश्वासन अग्रवाल यांना दिले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने खोटे ई-टेंडर काढून शहरवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.

विशेष म्हणजे 25 जूनपर्यंत शासनाच्या संकेत स्थळावर ई-टेंडर अपलोड झाली नसून, प्रत्यक्षात टेंडर प्रक्रिया सुरूच झाली नसल्याचे म्हटले आहे.

कारवाईचे आदेश

माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी उड्डाणपूल बांधकामाचे खोटे ई-टेंडर प्रकाशित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनी याची दखल घेत बांधकाम विभागाच्या सचिवांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. तर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे ई-टेंडर ही 30 जूनपर्यंत प्रकाशित होणार आहे.