Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

नागपूर महापालिकेच्या अधिकारी, कंत्राटदारांना जाग कधी येणार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील (Nagpur City) प्रत्येक वस्तीत, गल्लीत तुंबलेल्या सिवेज लाईन (Sewage Line) नागरिकांच्या आरोग्याला (Health) धोकादायक ठरत आहे. सातत्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याने एका व्यक्तीने चक्क सिवेज लाईनच्या चेंबरवरच ‘मुझे ठिक करो’, ‘प्रवीण कोटांगणे साहब, मैं टूट रहा हूॅं’, अशी तक्रार लिहून ठेवली आहे. झोपेत असलेले अधिकारी आणि कंत्राटदारांना जाग आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

प्रभाग क्रमांक २२ मधील गंगाबाई घाट परिसरातील सिद्धर्थ बुद्धविहार परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गंधीने त्रस्त आहेत. गेल्या पाच वर्षांपासून येथील सिवेज लाईन तुंबली आहे. येथील नागरिक, महिलांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रार केली. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी केवळ औपचारिकता पूर्ण करत आहेत. कर्मचारी केवळ काही वेळापुरती सिवेज लाईन स्वच्छ करतात. परंतु ही सिवेज लाईन जीर्ण झाली असून, काही काळानंंतर पुन्हा ती तुंबणे सुरू होते. आता मनपाचे अधिकारी, कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. यापूर्वी नगरसेवक असताना त्यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या; परंतु काहीही सुधारणा झाली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

अनेकदा तक्रारीनंतरही महापालिका लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांनी अनोखा उपक्रम दोन दिवसांपूर्वी राबविला. येथे फुटलेले चेंबर आणि फुटलेल्या सिवेज लाईनवर ‘मुझे ठिक करो’, ‘प्रवीण कोटांगणे साहाब, मैं टूट रहा हूॅं’ असे लिहून महापालिकेचे लक्ष वेधले. यातून सिवेज लाईन व तेथील चेंबर स्वतःच महापालिका व अधिकाऱ्यांकडे विनंती करीत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. चेंबरवर मनपा अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. निदान आता तरी महापालिका नवीन सिवेज लाईन तयार करून देईल, अशी या परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. नागरिकांच्या या वेगळ्या प्रकारच्या आंदोलनाला 'आप'चे प्रभात अग्रवाल यांनीही समर्थन दर्शविले आहे.

महापालिकेने नागरिकांच्या मागणीची दखल घेतली नाही तर सिवेज लाईनमधील घाण अधिकाऱ्यांच्या टेबलवर फेकण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.