Nagpur Tendernama
विदर्भ

जलवाहिन्या फक्त कंत्राटदारांची तहान भागवण्यासाठी टाकल्या का?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : दक्षिण नागपुरातील (South Nagpur) चक्रपाणीनगर, सिद्धेश्वरीनगर, गजानननगर, शारदानगर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी (Drinking Water) भटकंती सुरू आहे. परंतु पाच वर्षांपूर्वी संपूर्ण वस्तीत जलवाहिनी टाकूनही महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) भगवतीनगरवासींना तहानलेलेच ठेवले आहे. त्यामुळे जलवाहिन्या फक्त कंत्राटदारांची (Contractors) पैशाची तहान भागवण्यासाठी टाकल्या का, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दक्षिण नागपुरातील प्रभाग ३४ मधील अनेक भागांमध्ये अद्याप जलवाहिनीचे जाळे पसरले नाही. त्यामुळे या भागांतील नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. परंतु जलवाहिनी असूनही केवळ महापालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे गेल्या पाच वर्षांपासून भगवतीनगरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. २०१७ मध्ये या वस्तीमध्ये जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पाण्याची चाचणीही घेतली. परंतु नागरिक नळजोडणी घेण्यास तयार असूनही येथील नागरिकांना अद्याप नळजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे पाच वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात नागरिकांना दुचाकी, सायकलवरून पाण्यासाठी इतर वस्त्यांत भटकावे लागत आहे.

या भागात महापालिकेकडून जलवाहिनीचे जाळे सुरू करण्यात आले नसल्याने टॅंकरवर परिसर अवलंबून आहे. परंतु दहा दिवसांतून केवळ एक किंवा दोन ड्रम पाणी मिळत आहे. एक ड्रम पाणी दहा दिवस कसे पुरवायचे? याचे गणित महापालिकेनेच सांगावे, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. अनेकदा टॅंकर चालकांकडून पैसेही मागितले जात आहेत. यावर्षी फेब्रुवारीमध्येच विहिर आटली. त्यामुळे फेब्रुवारीपासून पाणीसंकट तीव्र झाल्याचे परिसरातील युवराज देवासे, पांडुरंग निलटकर, कुसुम महाजन, सुरेखा घवघवे यांनी सांगितले.

या परिसरात माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी जलवाहिनी आणली. परंतु आताचे आमदार तसेच माजी नगरसेवक नागरिकांच्या घरापर्यंत पाणी आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही नागरिकांनी केला. आमदाराकडे अनेकदा तगादा लावला. परंतु सहा महिने, पंधरा दिवस थांबा, असे सांगण्यात येत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.

रात्री बोअरवेलवर पाण्यासाठी गर्दी

या वस्तीत एकमेव बोरवेल आहे. जलस्तर खाली गेल्याने या बोरवेलला दिवसभर पाणीच नसते. रात्रीला जलस्तर थोडाफार उंचावतो. त्यामुळे रात्री बारानंतर या बोरवेअलवर गर्दी असते. अनेकदा रात्री तीन वाजेपर्यंत नागरिक येथून पाणी भरतात, असेही येथील नागरिकांनी नमूद केले.

दहा फूटांवरील वस्तीत पाणी

भगवतीनगरच्या बाजूलाच शेषनगर असून, येथील शिल्पा सोसायटीमध्ये सहा महिन्यांपूर्वीच जलवाहिनी टाकण्यात आली. येथील जलवाहिनी सुरू करण्यात आली. परंतु पाच वर्षांपासून दहा फूट अंतरावर असलेल्या भगवतीनगरात पाणी सुरू करण्यात आले नसून, महापालिका दुजाभाव करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.