Washim News वाशिम : वाशिम जिल्ह्यात आगामी वर्षात बचत गटाचे बळकटीकरण करून आदिवासी आणि अनुसूचित जाती घटकातील सर्व गरजू लाभार्थ्यांना शबरी आवास व रमाई आवास या सोबतच घरकुलाची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी, कर्मचारी यांना येणार्या वर्षभरामध्ये तीन उल्लेखनीय कामे करण्याचे लक्ष्य दिले आहे.
या अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या पाच विभागाचा कार्यभार आहे. हा कार्यभार सांभाळून तीन उल्लेखनीय कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यामध्ये एमएसआरएलएम अंतर्गत देण्यात आलेली उल्लेखनीय कामे करून घेणे आणि आवास योजनेच्या टीमकडूनही तीन उल्लेखनीय कामे करून घेण्याबाबतच्या कामाचा समावेश आहे.
तसेच पंधराव्या वित्त आयोगांतर्गत आतापर्यंत प्राप्त निधीपैकी सन 2024-25 या वर्षामध्ये 90 टक्के खर्च करणे या तिसर्या उल्लेखनीय कामाचा समावेश आहे. बचत गटाचे बळकटीकरण करणे आणि शबरी आवास व रमाई आवास या सोबतच घरकुलाची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असून, पंधराव्या वित्त आयोगाच्या सन 2024 - 25 या वर्षातील एकूण प्राप्त निधी पैकी किमान 90 टक्के निधी खर्च करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास संदर्भात पुढाकार घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रथम उल्लेखनीय कामांमध्ये एमएसआरएलएम टीमच्या माध्यमातून जिल्ह्यातील बचत गट बळकट करण्याबाबत भर देण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अशा पद्धतीने काम करण्यात येणार आहे की प्रत्येक गावातील किमान एक बचत गट असा असेल की त्यातील सर्व सदस्यांचा एक वर्षाचा निव्वळ नफा किमान एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल.
त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये किमान एक बचत गट असा असेल की त्या गटांनी बनवलेले उत्पादन आसपासच्या 50 गावांमध्ये विकले जातील आणि जिल्ह्यात किमान पाच बचत गट असे असावेत जे आपली उत्पादने किमान पाच जिल्ह्यांमध्ये विकतात.
दुसर्या उल्लेखनीय कामांमध्ये आवास टीमच्या माध्यमातूनही घरकुलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. विशेषतः शबरी आवास योजना आणि रमाई आवास अंतर्गत जिल्ह्यातील कोणत्याही गावामध्ये पात्र असलेला लाभार्थी घरापासून मुकणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या एकूण प्राप्त निधी पैकी सन 2024 - 25 या वर्षांमध्ये किमान 90 टक्के खर्च करणे याचा समावेश आहे.