Wardha zp Tendernama
विदर्भ

Wardha ZP : धक्कादायक! मर्जीतील कंत्राटदारासाठी टेंडर केले 'फ्रेम'?

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये आलेल्या एका लिपिकाने काहींशी मिळून टेंडर (Tender) मॅनेज करण्याची चर्चा होत आहे. नुकत्याच काही टेंडरच्या सूचना प्रसिद्ध झाल्या आहेत. यातील एका कामाचे टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या कॉलमध्ये ठराविक मर्जीतील कंत्राटदारालाच काम मिळावे म्हणून शॉर्ट फॉल मध्ये ऐनवेळी अटी व शर्ती बदलल्या गेल्या. त्यामुळे स्पर्धेतील कंत्राटदाराची अडचण झाल्याने लिपिकाच्या या प्रतापामुळे अनेकांच्या हातची कामे हिसकावली जात असल्याने बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून जवळपास 70 कामांची ई-टेंडर प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये वर्धा तालुक्यातील पिपरी (मेघे) येथील उपकेंद्राची संपूर्ण दुरुस्ती तसेच उपकेंद्राच्या आवारातील रस्ते, गट्ट बसविणे व सौंदर्गीकरण करणे या 48 लाख रुपयांच्या कामाचीही टेंडर होती. पहिल्या टेंडर सूचनेअंती कुणीही सहभाग घेतला नसल्याने दुसरा कॉल देण्यात आला.

त्यामध्ये स्पर्धक निर्माण झाल्याने आपल्याच मर्जीतील कंत्राटदाराला काम मिळावे म्हणून टेंडर लिपिकाने 'शॉर्ट फॉल' करून त्यात वर्षभराच्या बॅलन्स सीटची नियमबाह्यरीत्या अट टाकली. त्यामुळे मर्जीतील कंत्राटदारालाच त्याची पूर्तता करणे शक्य झाल्याची कंत्राटदारांमध्ये चर्चा होत आहे. 

आता हा प्रकार या एकाच कामात झाला की आणखी इतरही कामात झाला, याची चौकशी करून अशा टेंडर रद्द कराव्या व पुन्हा काढाव्यात तसेच टेडंर लिपिकाचा हा मनमर्जी कारभार रोखून बांधकाम विभागातील भोंगळ कारभार थांबवावा, अशी मागणी कंत्राटदार करीत आहे.

या प्रकरणी जि.प.वर्धा चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बांधकाम विभागातील हा प्रकार आताच कळला आहे. कोण तो लिपिक आणि नेमका काय प्रकार आहे, याची माहिती घ्यावी लागेल. याप्रकरणी संबंधितांकडून माहिती घेतो. यात नियमबाह्य असे काही आढळून आल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर कंत्राटदाराकडून त्या टेंडर भरल्या जातात. टेंडर भरल्यानंतर त्यामध्ये असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता झाली नाही किंवा काही कागदपत्रांची कमतरता असल्यास ते कागदपत्र सादर करण्यासाठी काही कालावधी दिला जातो. पण या कालावधीत अटी व शर्तीत बदल करता येत नाही. टेंडर सूचनेत सुरवातीला असलेल्या अटी व शर्तीचेच पालन करावे लागते. पण, या लिपिकाने ऐनवेळी शॉर्ट फॉल मध्ये अट टाकून स्पर्धा संपविण्याचा मनमर्जी कार्यक्रम आपल्या मर्जीनुसार चालविला.