wardha tendernama
विदर्भ

Wardha : 20 कोटींचा निधी मंजूर, मग 8 महिन्यांपासून 'त्या' कामाचे टेंडर का निघेणा?

टेंडरनामा ब्युरो

Wardha वर्धा : ग्रामपंचायत परिसरामध्ये सुद्धा नगरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरालगतच्या उमरी (मेघे) आणि पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दोन मुख्य रस्त्यांकरिता आमदार डॉ. पंकज भोयर यांनी 20 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून या रस्त्याच्या बांधकामाचे टेंडरच (Tender) निघाले नसल्याने काम सुरू झाले नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 

त्याचा त्रास ग्रामपंचायत प्रशासनाला सहन करावा लागत असल्याने दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांना निवेदन देऊन तातडीने टेंडर काढून काम सुरू करण्याची मागणी केली आहे.

शहरालगतच्या मारोतीभाऊ समाधी ते उमरी (मेघे) कडे जाणारा थेट रस्ता आणि महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय ते पिपरी (मेघे) गिरीपेठ पेट्रोलपंप चौकापर्यंतच्या रस्त्याकरिता आमदारांनी 20 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

लवकरच या रस्त्याचे काम होऊन रहदारी सोयीची होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु आठ महिन्यांचा कालावधी लोटला तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे टेंडर काढले नाही.

या दोन्ही कामाकरिता उमरी (मेघे)चे उपसरपंच सचिन खोसे व पिपरी (मेघे) च्या सरपंच वैशाली गौळकर यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. परंतु तरीही कामाला गती मिळाली नसल्याने सोमवारी दोन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांना निवेदन दिले. त्यांनी येत्या 10 ते 12  दिवसांत काम सुरू होणार असल्याची माहिती दिली. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.

शहरालगतच्या ग्रामपंचायत परिसरातील या दोन्ही रस्त्यांची स्थिती बिकट असून मोठमोठे खड्डे पडले आहे. यातून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष असून तो व्यक्त होत आहे. अशात येण्या-जाण्यासाठी त्रास होत आहे तर चिखलाने माखलेल्या कच्च्या रस्त्यामुळे जगोजागी खड्डे पडले आहेत.