अकोला (Akola) : सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला व जागतिक बँक प्रकल्प अकोला या यंत्रणामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० कोटी ९९ लाख ४० हजारांच्या एकूण २५ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सर्व कामांना पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकारी नीमा अरोरा (Nima Arora) यांनी स्थगिती दिली. ही स्थगिती म्हणजे नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या भ्रष्टाचाराचा सबळ पुरावा असल्याने त्यांच्या विरुद्ध आता तरी पोलिसांनी गुन्हे दाखल करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुंडकर यांनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरुद्ध ३ डिसेंबरला अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांसाठी निधी मजूर करताना पालकमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग करीत शासकीय निधीचा अपहार केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला दिली होती. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर एकच खळबळ उडाली. यंत्रणा कामाला लागली आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सचिव नीमा अरोरा यांनी तातडीने संबंधित यंत्रणांची सोमवारी सुनावणी घेतली.
तक्रारकर्ते डॉ. पुंडकर यांनी यासंदर्भात कोणत्याही सुनावणीची मागणी केली नसताना सुमोटो जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या बैठकीला तक्रारकर्ते उपस्थित नव्हते. जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी गिरीश शास्त्री, जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सरनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोला उपविभागाचे उपअभियंता दिनकर नागे, अकोट, तेल्हाऱ्याचे उपअभियंता संजय बोचे यांची उपस्थिती होती. या सुनावणीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर लेखाशिर्षक ३०५४ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना सात कामांकरिता चार कोटी ४० लाख व जागतिक बँक प्रकल्प अकोला यांना दोन कामांकरिता ५० लाख व लेखाशिर्षक ५०५४ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना १३ कामांकरिता चार कोटी २९ लाख ४० हजार व जागतिक प्रकल्प अकोला यांना तीन कामांकरिता एक कोटी ८० हजार रुपयांची दिलेली प्रशासकी मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत स्थगित केली असल्याची माहिती डॉ. पुंडकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला वंचितच्या युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, सचिन शिराळे उपस्थित होते.
‘वंचित’च्या तक्रारीतील रस्त्यांचाही समावेश
वंचित बहुजन आघाडीने सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमुद केलेल्या धनेगाव जुने ते धनेगाव नवीन, कुटासा ते पिंपळोद सत्ता व रिधोरा ते गायगाव जोडणाऱ्या लहान पूल व पोच रस्त्याच्या कामांसह अकोला ते नवीन धामणा पोच रस्ता सुधारणा आदी कामांची प्रशासकीय मान्यताही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगित केली आहे. शिवाय वंचितने केलेल्या आरोपानुसार रस्त्यांना क्रमांकच नसल्याचे सुनावणीतून स्पष्ट झाले असल्याचा दावा डॉ. पुंडकर यांनी केला.
‘वंचित’ म्हणते खोटी माहिती दिली
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह सुनावणीचे इतिवृत्त देताना त्यात खोटी माहिती देण्यात आल्याचा दावा वंचितचे डॉ. पुंडकर यांनी केला. त्यांनी केलेल्या दाव्यानुसारे धनेगाव जुने ते धनेगाव नवीन हा बाळापूर तालुक्यातील रस्ताच नाही. त्याचे मुळ नाव धनेगाव जोड रस्ता आहे. धनेगाव जुने व धनेगाव नवीन या दोन्ही गावाच्या मध्ये निर्गुणा नदी वाहते. त्यामुळे नदीतून रस्ता कसा तयार करणार, असा प्रश्नही डॉ. पुंडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
रस्त्यांची संख्या वाढणार
चुकीच्या प्रशासकी मान्यता दिलेल्या रस्त्यांची संख्या सध्या २५ असली तरी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या इतरही काही रस्त्यांच्या कामांबाबत संभ्रम असून, या उर्वरित रस्त्यांची प्रशासकीय मान्यताही स्थगित केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून प्रस्तावित विकास कामांनाच खिळ बसणार आहे.
पोलिस अधीक्षकांना दिले स्मरणपत्र
वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. पुंडकर यांनी ता. ३ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेवून कामांना स्थगित देत वंचितने केलेल्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता तरी पोलिसांनी पालकमंत्री व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारे स्मरणपत्र सोमवारी सायंकाळीच पोलिस अधीक्षकांना दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर तीन रस्त्यांच्या कामांच्या निधीचा पालकमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग करीत अपहार केल्यासंदर्भात मी तक्रार दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी २५ कामांना स्थगिती देवून त्याला एक प्रकारे दुजोराच दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता तरी पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता गुन्हे दाखल करावे. अन्यथा आम्हाला कायदेशीररित्या पुढील कार्यवाही करावी लागेल.
- डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
स्थगिती दिलेले रस्ते व निधी
लेखाशिर्षक ३०५४ अंतर्गत एकूण नऊ रस्त्यांना स्थगिती
१)मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढाेरे पाेच रस्ता मजबुतीकरण (२० लाख)
२) जांब ते रस्त्यावर स्लॅब ड्रेन बांधकाम करणे (२० लाख )
३) खारपाण सालपी रस्त्याची सुधारण ( १५ लाख)
४) मूर्तिजापूर तालुक्यातील भटाेरी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता (२० लाख)
५) पातूर तालुक्यातील साेनुना ते पांढुर्णा रस्ता बांधकाम (१ काेटी ८० लाख)
६) पातूर ते भंडारज ( १ काेटी ६० लाख)
७) धनेगाव जुने ते धनेगाव नवे रस्त्याचे बांधकाम (३५ लाख)
८) चाेहाेट्टा धामना-करतवाडी रस्ता सुधारणा ( २५ लाख)
९)वेताळबाबा संस्थान ते मराेडा रस्त्याची दुरुस्ती करणे (२५ लाख)
लेखाशिर्षक ५०५४ अंतर्गत १६ रस्त्यांना स्थगिती
१) कवठा ते धनकावडी रस्ता (३५ लाख)
२) टिटवा ते जमकेश्वर (३० लाख)
३) धनकवडी ते कावठा सुधारणा करणे (२० लाख)
४) कुटासा ते पिंपळाेद पूल बांधकाम (१ काेटी २५ लाख)
५) गायगाव ते रिधाेरा पूल व पाेच रस्ता (७४५ लाख)
६) धामणा सुधारणा (२० लाख)
७) चिखलगाव त जलालाबाद पूल दुरुस्ती (१४ लाख ९० हजार)
८)तामशी-रामगाव रस्ता (१४ लाख ९० हजार)
९) निंबी ते जनुना( १४ लाख ९० हजार)
१०) निपाणी-ढगा (१४ लाख ९० हजार)
११) पाटखेड ते चिंचाेली (१४ लाख ९० हजार)
१२) बोरगाव दुधलम ते धोत्रा १४ लाख ९० हजार)
१३) म्हैसपूर ते चांगेफळ (१४ लाख ९० हजार)
१४) किनखेड ते किनखेड फाटा (८०लाख)
१५) काेसगाव ते दाेधानी (७० लाख )
१६) हिंगणा ते बेलुरा रस्त्याचा (८० लाख)