यवतमाळ (Yavatmal) : औद्योगिक विकास वसाहतीत (MIDC) तब्बल 198 प्लॉट गेल्या कित्येक वर्षापासून उद्योग न उभारता पडून आहे. ते तातडीने परत घेतले जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अमरावती विभागात सर्व एमआयडीसीमध्ये 770 प्लॉटवर अद्यापही उद्योगाची उभारणी करण्यात आली नाही. हे प्लॉट संबंधित उद्योजकांना देण्यात आले होते. यात यवतमाळ एमआयडीसीमध्ये 198 प्लॉटवर अद्याप उद्योग उभारण्यात आले नाही. असे सर्व प्लॉट आता तातडीने परत घेतले जाणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्ह्यात नवीन प्रकल्प आणणार असल्याचेही ते म्हणाले.
या प्रकल्पाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात करतील, असेही त्यांनी सांगितले.
नेर तालुक्यातील वटफळी येथे 100 ते 300 हेक्टरमध्ये नवीन एमआयडीसी उभारण्यात येणार असल्याचेही उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे उद्दिष्ट 104 टक्के पूर्ण केल्याचेही चे त्यांनी सांगितले. तसेच विश्वकर्मा ने. योजनेअंतर्गत यवतमाळात प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता एमआयडीसीमध्ये लघु उद्योजकांसाठी 20 टक्के जागा राखीव द ठेवणार असून दरवर्षी जिल्ह्यातील पाच लघु उद्योजकांना अभ्यासासाठी विदेश दौऱ्यावर पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड, आमदार अॅड. नीलय नाईक, आ. नामदेव ससाने, आ. इंद्रनील ही नाईक, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड आदी उपस्थित होते.
25 एकरावर फूड पार्क :
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात 25 एकरात फूड पार्क उभारण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सांगितले. तसेच अमरावती येथील टेक्सटाईल पार्क पूर्ण झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातही टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत विचार करणार असल्याचे सांगितले. याशिवाय एमआयडीसीच्या वीज केंद्रातून ज्या शाळांना वीज जोडणी दिली आहे, ती खंडित करणार असल्याचे त्यांनी सांगितली. संबंधित शाळांनी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच महावितरणच्या ज्या अधिकाऱ्यांनी अशी वीज जोडणी दिली, त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
बसस्थानकांतील रस्त्यांसाठी कोट्यवधी -
जिल्ह्यातील बसस्थानकांमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर केल्याचेही उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. त्यात दिग्रससाठी दोन कोटी 18 लाख, दारव्हा दोन कोटी 66 लाख, घाटंजी दोन कोटी, लाडखेड 1 कोटी, शेंबाळपिंपरी 1 कोटी 12 लाख, ढाणकी एक कोटी, वणी 2 कोटी 45 लाख, उमरखेड तीन कोटी 54 लाख आणि पुसदसाठी दोन कोटी 75 लाख रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
विदेशी गुंतवणुकीत राज्य अव्वल
यापूर्वीच्या सरकारमध्ये विदेशी गुंतवणूक आटली होती. त्यावेळी कर्नाटक, गुजरातसारखे राज्य विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार येताच राज्यात विदेशी गुंतवणूक वाढल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच नवी मुंबई येथे डायमंड हब होणार असल्याचे स्पष्ट केले.