MIHAN Tendernama
विदर्भ

Nagpur : आता मिहानमध्ये मिळणार नवीन रोजगारच्या संधी; चार कंपन्या लवकरच...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मिहानच्या सेक्टर 21 मध्ये दोन आयटी आणि दोन खाद्यान्न प्रक्रिया कंपन्यांचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी दिली. याकरिता एमएडीसी नवीन रस्ता तयार करत आहे.

याशिवाय हिंगणाला जोडण्यासाठी पतंजली बाजूकडून चौपदरी रस्ता आणि अंतर्गत रस्त्याचे कामही सुरू होणार आहे. मिहान कॅम्पसमधील मध्यवर्ती सुविधा इमारतीतील कार्यालयाच्या सभागृहात पांडे यांनी मिहान विकासाची माहिती दिली. सोबतच रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील. आणि युवकांना रोजगार मिळेल. सोबतच त्यांनी सांगितले की, 3.5 एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधण्यात येणार आहे. मिहानमधील या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे कंपन्यांसाठी सुविधा वाढेल. मिहान-सेझमध्ये लवकरच नवीन फार्मा कंपन्या येणार आहेत. शिर्डी आणि अमरावती विमानतळाच्या विकासाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होईल. गडचिरोलीतील विमानतळासाठी जमिनीचा विचार सुरू आहे.

गेलचे मध्यवर्ती कार्यालय 17 एकरात बांधले जाणार :

गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) मिहानच्या बिगर एसईझेड क्षेत्रातील सेक्टर 12-ए मध्ये त्यांचे केंद्रीय कार्यालय स्थापन करणार आहे. गेलचे डेटा सेंटर आणि मॉनिटरिंग सेंटर राहील. सार्वजनिक क्षेत्रातील या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. गेलला जमीन देण्याची आणि करारावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पतंजलीच्या ज्यूस प्रकल्पाचे संचालन एप्रिलपासून होईल. मिहानमध्ये आतापर्यंत 1 लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराची आकडेवारी आणखी वाढेल.