bridge Tendernama
विदर्भ

Nagpur : एकीकडे वाहतूक कोंडीने वैताग अन् दुसरीकडे पूल सुरू करण्यासाठी नाही मुहूर्त

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मुख्य मार्गावरील एक किलोमीटर अंतरावर दोन-दोन ठिकाणी वळण आणि पंचशील चौकातील रेंगाळलेल्या कामामुळे चारहीबाजूंच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे वारंवार ट्रैफिक जाम होत असून, वाहनधारकोसोबत सर्वसामान्य नागरिकही चांगलेच वैतागले आहेत.

उपराजधानीतील प्रमुख बाजारपेठ म्हणून सीताबर्डीचा उल्लेख सर्वदूरचे नागरिक करतात. या बाजारपेठेत खाण्यापिण्याच्या चीजवस्तूंपासून कपडे, खेळणी असे सर्वच मिळत असल्याने विदर्भातून खरेदीच्या उद्देशाने आलेली मंडळी सर्वप्रथम सीताबर्डीलाच पसंती दर्शवितात. याशिवाय सीताबर्डीलगतची रामदास पेठ आणि धंतोली या परिसरांत आरोग्य सुविधांसाठी अनेक पर्याय आहेत. सीताबर्डीच्या समोरूनच रेल्वे स्थानक गाठता येते. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, पुसद, उमरखेड आणि अशाच दूरदूरवरून येणाऱ्यांची सीताबर्डी परिसरात, बाजारपेठेत 12 महिने वर्दळ असते. नमूद गावोगावच्या नागरिकांना सीताबर्डी, संविधान चौक किंवा रेल्वे स्थानकाकडे जायचे असेल तर त्यांना लोकमत चौक, पंचशील चौक, झांशी राणी चौक आणि पुढचा व्हरायटी चौक म्हणजेच सीताबर्डीची बाजारपेठ, हा सरळ मार्ग आहे.

मात्र, सप्टेंबर 2023 मध्ये आलेल्या महापुरामुळे पंचशील चौक आणि झांशी राणी चौकाच्या मधला पूल वाहून गेला, तेव्हापासून संथगतीने या पुलाचे काम सुरु आहे. अर्थात इकडून पंचशील चौक तर तिकडून झांशी राणी चौकातून वाहतूक वळविण्यात आली आहे. परिणामी लोकमत चौकापुढे गेल्यानंतर पंचशील चौकातून यशवंत स्टेडिअममार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. आधीच हा मार्ग फारसा मोठा नाही. त्यात मेहाडिया चौक ते महाराष्ट्र बैंक चौक मार्गामध्ये सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर तशीही वाहनांची गर्दी असते. आता सप्टेंबर महिन्यापासून पंचशील चौकातून सीताबर्डीची वाहतूक वळविण्यात आल्याने या मार्गावर वाहतुकीची वारंवार कोंडी होते. वारंवार जाम लागतो आणि त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

व्यावसायिक धुळीने त्रस्त : 

वाहतुकीचा अतिरिक्त लोड आल्याने आणि वाहनांची मोठी गर्दी झाल्याने पंचशील चौक, पत्रकार भवन, मेहाडिया भवन, यशवंत स्टेडिअम ते महाबैंक चौकापर्यंत असणाऱ्या वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वारंवार ट्रैफिक जाम होत असल्याने तसेच वाहन ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने या मार्गावरील दुकानात येण्यापेक्षा बाहेरगावचे ग्राहक दुसऱ्या भागातील दुकानांकडे जाणे पसंत करतात. त्यामुळे या भागातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम आल्याची खंत करीत आहेत.