Raj & Uddhav Thackeray Tendernama
विदर्भ

'या' एका रस्त्याने शिवसैनिकांना थकवले; आता घेतोय मनसेची परीक्षा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : हुडकेश्वर सिमेंट काँक्रिटचा रस्ता आणि त्यावरच्या एका पुलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी आंदोलन करून शिवसैनिक (Shivsena) थकले. आता याच रस्त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) ठेकेदारावर (Contractor) कुठलीच ॲक्शन घ्यायला तयार नाही.

एका राजकीय नेत्याचा आशीर्वाद आणि अधिकाऱ्यांना मोठे कमिशन दिले असल्याने ठेकेदारावर कारवाई केली जात नसल्याची चर्चा आहे. हुडकेश्वर सिमेंट रोडचे बांधकाम निकृष्ट करण्यात आले आहे. २५ वर्षे हा रस्ता टिकेल याची कुठलीही शाश्वती दिसत नाही. वर्षभरातच सिमेंटच्या आतील गिट्‍टी बाहेर आली आहे. सिमेंटमध्ये राखच अधिक भेसळ करण्यात आली असल्याने एक वाहन जरी गेले तरी रस्त्यावर धुळ उडते.

या रस्त्याच्या विरोधात शिवसेनेने अनेकदा आंदोलने केली. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी आंदोलन करणे सोडून दिले. आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा विषय हाती घेतला आहे. त्यांनी संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. आधीचा अनुभव बघता शिवसैनिकांप्रमाणे अधिकारी मनसेच्या कार्यकर्त्यांनाही थकवणार असल्याचे दिसून येते.

सार्वजनिक बांधकाम विभाग (ग्रामीण) अंतर्गत हुडकेश्र्वर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र दोन वर्षे झाली तरी काम संपतच नाही. असे असताना अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. विभागाची कृपादृष्टी व राजकीय पाठबळामुळे ठेकेदार बिनधास्त झाला आहे. भाजपच्या कार्यकाळत या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढण्यात आले होते. भाजप नेत्यासोबत जवळीक असलेल्या ठेकेदाराला या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात कोरोनामुळे काम बंदच होते. आता पुन्हा राज्यात भाजपची सत्ता आली असल्याने ठेकेदार आणखीच बिनधास्त झाला आहे.