Nagpur Tendernama
विदर्भ

नागपूरच्या वैभवात भर टाकणार 'ही' देखणी इमारत! 6 कोटींचा खर्च...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात आणखी एका सुंदर व आकर्षक इमारतीची भर पडणार आहे. विविध राज्यांतील लोककला, लोकसंगित कलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रासाठी (South Central Zone Cultural Centre) ही इमारत उभारण्यात येत आहे.

या इमारतीवर सहा कोटी १७ लाख रुपयांचा खर्च केले जाणार आहे. केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नऊ महिन्यांत ही इमारत पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले. कला क्षेत्राला साजेशा असा या इमारतीचा 'लूक' राहणार आहे. दर्शनी भागात मोठा कॅन्व्हास उभारला जाणार आहे. त्यावर कलावंतांना पेंटिंग रेखाटण्याची मुभा राहाणार आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला नागपुरात १९८६ साली राज्य सरकार जमीन उपलब्ध करून दिली होती. एका जुन्या इमारतीत केंद्राचे काम सुरू होते. आता नवी इमारत बांधण्यात येत आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर प्रदर्शनासाठी सभागृहाची निर्मिती केली जाणार आहे.

अभिलेख कक्ष, उपहारगृह, कर्मचारी कक्ष, लिफ्ट, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पहिल्या माळ्यावर बैठका, चर्चासत्र, संमेलन, सादरीकरणासाठी छोटेछोटे सभागृह, दुसऱ्या माळ्यावर विश्राम कक्ष व कार्यालय राहणार आहे. संमेलन कक्षात डिजिटल ध्वनिप्रणाली, प्रकाशित सायनेज, इपीबीएक्स सिस्टीम, डी.जी.सेट, यूपीएस, सी.सी.टी.व्ही कॅमेरे, अग्निशामक सुविधा, एलएडी दिव्यांची व्यवस्था केली जाणार आहे.