Potholes (File) Tendernama
विदर्भ

गडकरींच्या जिल्ह्यातील 'या' राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा जिल्ह्यातील असल्याने येथील सर्वच रस्ते प्रशस्त व गुळगुळीत असतील असा सर्वांचा समज आहे. मात्र हा निव्वळ भ्रम आहे. नागपूर शहरापासून (Nagpur City) अवघ्या ३० किलोमीटरवच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे (Potholes) पडले आहेत.

मौदा (Mauda) नगर पंचायत हद्दीत असलेल्या रबडीवाला ते केसलापूर जुन्या राष्ट्रीय महामार्गवर मोठ मोठे खड्डे पडले असून, धुळीच्या ढगातूनच हा रस्ता पार करावा लागतो. वारंवार निवेदने, तक्रारी दिल्यानंतरही अधिकारी लक्ष देत नसल्याने ठेकेदाराने हात वर केले आहेत.

कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, तर रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो. जयस्वाल शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दोन आमदार सत्तेत असतानाही अधिकारी ऐकत नाही. रस्त्याची नियमित डागडुजी करीत नाही. एनटीपीसी प्रकल्प या मार्गाचा सर्वाधिक वापर करतो. मात्र ते सुद्धा लक्ष देत नाही. त्यामुळे सत्तेत असतानाही येथील आमदारांना प्रशासनाकडे निवेदन देऊन विनंती करवी लागते आहे.

मौदा शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या मार्गावर भंडारा व पुढे छत्तीसगड या राज्यात जाता येते. त्यामुळे सातत्याने या रस्त्यावर वर्दळ असते. एनटीपीसी प्रकल्पातील राखेचे ट्रकही याच मार्गाने प्रवास करीत असतात. खड्ड्यांमुळे सर्वत राख उडते. रात्रीच्या वेळी प्रवास करताना येथून खड्डे वाचवावे लागतात आणि धुळीमुळे पुढचे काहीच दिसत नाही. त्यामुळे चांगलीच कसरत करावी लागते. अपघाताचीही शक्यता असते.

मौदा ही प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने या ठिकाणी शाळेतील मुले, तसेच शेतकरी वर्ग, प्रवाशांना याच मार्गाने कायम प्रवास करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सबंधित विभागाकडून तात्पुरती डागडुगी करण्यात येते. पुन्हा काही दिवसांनी अवस्था जैसे थे होते. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे.