अकोला (Akola) : दिवाळीच्या काळात एसटी आणि रेल्वे फुल्ल असल्याचा फायदा खासगी बसचालक घेत आहेत. परिवहन विभागाच्या नियमाप्रमाणे एसटी तिकीट दराच्या तुलनेत ५० टक्के अधिक दर घेण्याची मुभा खासगी बसचालकांना दिली आहे. प्रत्यक्षात एसटीच्या तुलनेत दुप्पट तर काहीवेळा तिप्पट दर आकाराला जात आहे.
दिवाळीच्या तोंडावर पुण्या-मुंबईवरून गावी येणाऱ्यांची आर्थिक लूट खासगी बसचालकांकडून केली जात आहे. दिवाळी संपल्यावर परतीच्या प्रवासात तर दर जवळपास तिप्पटच होतात. दरम्यान, आता दिवाळीपूर्वीच भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्याहून नागपूर, अकोला येण्यासाठी खासगी बसचे दर दुप्पट झाले आहेत. विमान प्रवासाचे भाडे बससाठी लागत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
सध्या अकोल्याहून पुणे-मुंबईसाठी जाणाऱ्या बसचे दर त्या प्रमाणात कमी आहेत. बसचालक अवाजवी दर आकारत असल्याने प्रवाशांची लूट केली जात आहे. पुण्याहून सुटणाऱ्या खासगी बस चालकांकडून बुकिंग फुल्ल असल्याचे सांगून अधिकचे भाडे वसूल केले जात आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने बसच्या संख्येतही वाढ होते.
दिवाळीमध्ये खासगी बस अतिरिक्त धावतात. अनेक बसचालक गाड्या दुसऱ्यांकडून भाडेतत्वावर घेतात. त्यामुळे अशा गाड्यांचे तिकीट दर अन्य बसच्या तुलनेत अधिक असते. पुण्यातून विदर्भात दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात.
अनेक खासगी बसचालक ३०० किलोमीटरहून अधिक दूरच्या प्रवासासाठी धावणाऱ्या बसच्या दरात मोठी वाढ करतात. तुलनेत साध्या बससाठी (सीटिंग) कमी दरवाढ केली जाते.
दिवाळी संपल्यानंतर परतीचा प्रवास आणखी महाग होतो. कोणत्याही परिस्थितीत नोकरी निमित्ताने पुण्याला जावे लागते. त्या वेळी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे पुणे गाठण्यासाठी प्रवाशांना खासगी बसवर अवलंबून राहावे लागते. अशा वेळी खासगी बसचालक दिवाळीत जो दर आकारतात, त्यात आणखी ४०० ते ५०० रुपयांची वाढ करतात.