Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nagpur: कोंडी फोडणाऱ्या 'या' प्रकल्पाचे गडकरींच्या हस्ते भूमीपूजन

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : केंदीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज नागपूर शहरातील इंदोरा चौक-अशोक चौक-शीतला माता चौक-दिघोरी चौक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-डी वरील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन केले.

या उड्डाणपुलाशी संबंधित बातमी 'टेंडरनामा'ने 'उपराजधनीतील या उड्डाणपुलाची 7 वर्षांपासून रखडपट्टी' या शीर्षकाने प्रकाशित केली होती. 'टेंडरनामा'च्या या बातमीची दखल घेण्यात आली असून, आज या मोठ्या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले.

नागपूरच्या सक्करदरा चौक येथे भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या उड्डाणपुलासाठी सुमारे 998 . 27 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावित उड्डाणपुलाची लांबी 8.9 किमी असून या प्रकल्पातील सर्व्हिस रोडची लांबी 13.82 किमी राहणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे .

या उड्डाणपुलाची रचना 2 लेनच्या रुपात केली आहे, ज्याची रुंदी 12 मीटर आहे.  उड्डाणपुलाची रचना UHPFRC तंत्र वापरून (अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड काँक्रिट) केली आहे. या प्रकल्पात दोन आरओबी - रेल्वे उड्डाणपूल आणि आरयूबी रेल्वे भूयारी मार्गाचा प्रस्ताव समावेश केला आहे.

नागपूरच्या पाचपावली येथील विद्यमान आरओबी तोडून त्याची पुनर्बांधणी केली जाईल, पूर्व दिशेला (नाईक तलावाच्या दिशेने) आणि पश्चिमेकडील (पाचपावलीच्या दिशेने) विद्यमान रॅम्प कायम ठेवले जातील.

भंडारा रोड, मेडिकल चौक आणि नागपूर बसस्थानकाकडे सध्याच्या जोडलेल्या रस्त्यांकडे अप/डाऊन रॅम्पसह अशोक चौकात एक एलिव्हेटेड रोटरी (चक्राकार रस्ता)  म्हणून पायलॉनची रचनाही यात प्रस्तावित आहे.

उड्डाणपुलाच्या बांधकामाअंतर्गतच रस्तेही विकसित केले जातील. ज्यामध्ये 3 प्रमुख जंक्शन आणि 11 लहान जंक्शन यांचा समावेश राहणार आहे. हा प्रस्तावित उड्डाणपूल उत्तर नागपूरच्या  इंदोरा चौकापासून सुरू होईल आणि दक्षिण नागपूरच्या दिघोरी चौक येथे संपेल.

या उड्डाणपुलाचा भाग दाट लोकवस्तीच्या नागरी भागातून जात आहे. जेथे अनेक व्यावसायिक आस्थापने, दुकाने, स्थानिक बाजार  आहेत. या भागात वारंवार होणारी वाहतूक कोंडी, अपघात, रेल्वे क्रॉसिंगवर जाम या समस्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामाने सुटणार आहेत. भंडारा आणि उमरेडच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील सुरळीत होईल.

जंक्शन विकसित केल्याने अपघातांची संख्या कमी होईल, तसेच प्रवासाच्या वेळेत शहरी भागात प्रदूषण नियंत्रणासह इंधनाची बचत होईल. इंदोरा चौक ते सीए रोड, दिघोरी, उमरेड, शासकीय रुग्णालय, बस स्थानक या दिशेने प्रवासाचा वेळ आणि इंधनाची सुद्धा बचत होणार आहे.