वर्धा (Wardha) : वर्धा जिल्हा परिषदेत एका अस्थायी लिपिकामुळे टेंडर संबंधित वाद समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मार्च अखेर आणि आचारसंहितेच्या वेळेस हिंगणघाट आणि समुद्रपूर पंचायत समितीतून दोन टेंडर लिपिक उसणवारीवर बोलावले होते. यातील एक लिपिक आपल्या पदस्थापनेच्या ठिकाणी परत गेला. परंतु दुसऱ्या लिपिकाचा अजूनही जिल्हा परिषदेतच मुक्काम आहे. गेल्या सहा महिन्यांपासून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असलेल्या या लिपिकाने टेंडरमध्ये गोंधळ केल्याने जिल्हापरिषदचा बांधकाम विभाग सातत्याने वादाच्या भोवऱ्यात आहे. तरीही यावर कारवाई होत नसल्याने त्याला आशिर्वाद कुणाचा आणि कशासाठी? अशी चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात पदस्थापना असलेले दोन टेंडर लिपिक आधीच कार्यरत आहे. पण, अचानक मार्च अखेर आणि लोकसभा आचासंहितेचे कारण पुढे करून तात्पुरत्या स्वरूपात हिंगणघाट आणि समुद्रपूर पंचायत समितीतून दोन टेंडर लिपिक बोलावण्यात आले होते. हा आदेश तत्कालिक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला होता, हे विशेष.
या दोन लिपिकांच्या कार्यकाळात कोट्यवधीचे टेंडर झाले असून त्यामध्ये तीन पंचायत समितीसह इतरही कामांचा समावेश आहे. हे दोन्ही लिपिक टेंडर मॅनेज करण्यात माहिर असल्यानेच त्यांना बोलावण्यात आल्याची चर्चा आजही होत आहे. यातील हिंगणघाट येथील लिपिक आपल्या पंचायत समितीत परत गेला. पण, समुद्रपुरातील लिपिकाने बांधकाम विभागात ठिय्याच मांडला.
काही नेत्यांच्या मनाप्रमाणेच टेंडर व कामे देण्याचा सपाटा सुरू आहे. याकरिता अधिकाऱ्यांवरही राजकीय दबाव आणून त्यांची दिशाभूल केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून समुद्रपूर पंचायत समितीतील लिपिक वर्धा येथे कार्यरत असून त्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कार्यकारी अभियंता गुंडतवार यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही.
या प्रकरण संबंधित अतिरिक्त मुख्य कार्यकारी, अधिकारी, जि.प. वर्धा सूरज गोहाड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बांधकाम विभागामध्ये लिपिकांची नियुक्ती केली होती, अशी माहिती आहे. परंतु त्यासंदर्भात सविस्तर काही सांगता येणार नाही, त्याची चौकशी करावी लागेल.