Amravati News अमरावती : तिवसा तालुक्यातील भिवापूर लघु प्रकल्पाचा सांडवा आणि कालव्याच्या दुरुस्तीसाठी महा ई-टेंडर (E Tender) संकेतस्थळावर तीन कोटींच्या कामांचे टेंडर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी परस्पर तीनदा उघडले आणि या टेंडर मध्ये मर्जीतील कंत्राटदाराने (Contractor) टेंडर न भरल्याने तो रद्द केल्याचा गैरप्रकार विधीमंडळात पोहोचला आहे.
या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे विधीमंडळ कामकाजासाठी संपूर्ण माहिती मागवली असून, अभियंता अनिकेत सावंत यांच्यावर फौजदारी दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, यासाठी 24 मे रोजी पत्र दिले आहे.
अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागाचे तत्कालीन प्रभारी अभियंता अनिकेत सावंत यांनी पदाचा दुरुपयोग करून वरिष्ठांची परवानगी न घेता पोर्टलवरील टेंडर तीनवेळा उघड केले. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी गत दोन वर्षांत दिलेल्या वर्कऑर्डर आणि टेंडर प्रक्रियेची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून तत्काळ निलंबन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना विरोधी पक्षनेत्यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
मुख्य सचिवांचे पत्र आले जलसंपदा विभागात
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पत्रानुसार, अमरावती येथे ऊर्ध्व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात 3 जून रोजी मुख्य सचिवांचे पत्र धडकले आहे. कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांच्या कार्यकाळात झालेल्या ई-टेंडरमधील गैरप्रकाराची माहिती विधीमंडळात पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे
ई-टेंडर परस्पर उघडले, असे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. दोन वर्षात अभियंता अनिकेत सावंत यांनी राबविलेल्या टेंडरची माहिती प्राप्त झाली आहे. विधीमंडळात लक्षवेधी सादर झाली असून, चर्चेदरम्यान जलसंपदा विभागाचा कारभार उघडकीस आणला जाईल, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.