Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur:ई-टॅक्सीमुळे पेट्रोल, डिझेलवरील टॅक्सीचालक बेरोजगार;टेंडर..

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महापालिकेत नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ई-टॅक्सी मर्यादित किलोमीटर धावत असून अधिकाऱ्यांची कामे प्रभावित होत आहेत, असा दावा ऑरेंज सिटी टॅक्सी ओनर्स असोसिएशनने केला आहे. त्यामुळे या ई-टॅक्सीचे टेंडर रद्द करून सीएनजी व पेट्रोलवरील टॅक्सीसाठी पुन्हा नव्याने टेंडर काढावे, अशी मागणी असोसिएशनने केली. 

महापालिकेने नुकत्याच 25 ई-टॅक्सी अधिकाऱ्यांसाठी भाड्याने घेतल्या. त्यामुळे पारंपरिक पेट्रोल, डिझेलवरील टॅक्सीचालक बेरोजगार झाले आहेत. या चालकांना पुन्हा रोजगार मिळावा, या हेतूने ऑरेंज सिटी टॅक्सी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष घाटे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

नवीन ई-टॅक्सी सुरू होऊन दहा दिवस झाले असून या कालावधीत या टॅक्सीच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. पूर्ण चार्जिंगनंतर या टॅक्सी केवळ 120 किमी धावत आहे. अधिकाऱ्यांना अनेकदा झोन व सिव्हिल लाइन्स कार्यालय, न्यायालये आदी ठिकाणी जावे लागते. ई-टॅक्सीमुळे त्यांच्या कामावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याचे घाटे यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. एवढेच नव्हे तर चार्जिंग स्टेशनचा अभाव असल्याने भविष्यातही अधिकाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागू शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अधिकाऱ्यांची गैरसोय बघता ई-टॅक्सीचे टेंडर तत्काळ रद्द करावी, अशी मागणी घाटे यांनी केली.

निर्णय प्रलंबित

महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांसोबतच पेट्रोल, डिझेल, सीएनजी वाहनांसाठीही टेंडर आमंत्रित केले होते. परंतु या निविदेनंतर केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी टेंडर काढण्यात आले. राज्य सरकारचे इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण असल्याचे सांगून आमचे टेंडर रद्द करण्यात आले. यासंबंधात तत्कालीन आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी केवळ प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रिक टॅक्सी सुरू करीत असल्याचे सांगितले होते. उर्वरित 75 वाहनांसाठी नवीन टेंडर काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु याबाबत कुठलाही निर्णय झाला नसल्याचे घाटे यांनी आयुक्तांना सांगितले.