MIHAN Tendernama
विदर्भ

मिहानमध्ये आता टाटा एअरबस प्रकल्पाचे 'चॉकलेट'!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण तापले असताना आता टाटा एअर बसचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये येणार असल्याचे 'चॉकलेट' दिले जात आहे. यापूर्वी अंबानीच्या राफेल, रामदेव बाबांचा पतंजली आणि बोईंगच्या एमआरओचे दिलेले 'चॉकलेट' अद्याप विरघळलेले नाही. यापैकी एकही प्रकल्प नागपूरमध्ये सुरू झाला नाही.

नागपूर तसेच विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी मिहान प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. नागपूर देशाचेच नव्हे तर जगाचे मध्यवर्ती ठिकाण आहेत. नागपूरच्या आकाशातून शेकडो विमाने जात असतात. त्यांना नागपूरला थांबा द्यावा आणि पूर्व आणि पश्चिमी देशाच्या व्यावसायिक सोयीसुविधेसाठी मिहान प्रकल्पाची स्थापना करून लॉजेस्टिक हब उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावेळी केलेली एकही घोषणा अस्तित्वात आली नाही आणि मोठा उद्योगही सुरू झाला नाही. चारदोन आयटी कंपन्या येथे सुरू आहेत. मात्र त्यामुळे फारसा रोजगार उपलब्ध झालेला नाही. लोकांच्या हाताला प्रत्यक्ष काम मिळाले नाही. लॉजेस्टिक हबचा उद्देशही पूर्ण झाला नाही. मिहान प्रकल्पात येणाऱ्या कंपन्यांच्या यादीत वेदांताच्या एका दुसऱ्या उद्योगाचा समावेश होता.

वेदांताचा प्रकल्प गुजरातने पळवल्यानंतर त्याहीपेक्षा मोठा प्रकल्प आणण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. उदय सामंत यांनी टाटा एअर बसचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले. यात टाटा समूह ९० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र आता यावर कोणाचा विश्वास नाही. मिहानच्या अधिकाऱ्यांचेही हेच म्हणणे आहे. प्रकल्प जेव्हा येईल तेव्हा आपण बोलू, असे सांगून त्यांनी यासंदर्भात फारसे बोलण्याचे टाळले.