Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : 'डेंटल'च्या सुपर स्पेशालिटीची प्रतीक्षा कधी संपणार?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे (डेंटल) अविशेषोपचार रुग्णालय केवळ रुग्णांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार होते. नवनवे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार होता; परंतु, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी होऊनही अद्यापही पूर्णत्वास आले नाही. येथील पदभरतीला घेऊनही निर्णय झालेले नाही. यामुळे हे हॉस्पिटल पांढरा हत्ती तर ठरणार नाही ना, अशी भीती उपस्थित केली जात आहे.

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार रुग्णालयाचा (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) बांधकामाचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला. 2018 मध्ये  प्रस्तावाला मंजुरी मिळाली. इमारतीच्या बांधकामासाठी 22 कोटींची तरतूद करण्यात आली. 4 जानेवारी 2019 रोजी डेंटलच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोनशिलाचे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यामुळे मुदतीत या हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण होऊन रुग्णसेवेत सुरू होईल, अशा अपेक्षा सर्वांच्या होत्या. 7 ऑगस्ट 2019 रोजी मंजूर निधीमधून 2 कोटी 24 लाख रुपयांचा पहिला हप्ताही मिळाला.

मेडिकलच्या जागेवरील 4,693 चौरस मीटर जागेवर बांधकामाला सुरुवात झाली; परंतु, नंतर दुसऱ्या व नंतरच्या टप्यातील निधी मिळण्यास उशीर झाला. त्यात कोरोनाचे दोन वर्षे गेल्याने इमारत पूर्ण होण्यास वेळ गेला. सध्या इमारतीचे 80 टक्के काम पूर्ण झाले असलेतरी बाह्य व अंतर्गत सजावटीचे अद्याप बाकी आहे. बांधकाम विभाग व विद्युत विभागामध्ये समन्वय नसल्याने लिफ्ट व विद्युत कामांना सुरुवातही झाली नाही.

पदभरतीही बारगळली :

राज्यातील पहिल्या डेंटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला लागणाऱ्या 111 कायमस्वरूपी तर 22 अस्थायी पदांचा प्रस्ताव ऑगस्ट 2022 मध्ये पाठविण्यात आला. परंतु, काही त्रुटींमुळे तो फेटाळण्यात आला. नंतर पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला; परंतु, अद्यापही याला मंजुरी मिळालेली नाही. 

नवे विभाग सुरू होणार होते :

सुपर स्पेशालिटीमध्ये 'ओरल इम्प्लांटलॉजी कोर्स, डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटीक डेन्टीस्ट्री', 'डिजिटल डेन्टीस्ट्री', 'फॉरेन्सिक ऑन्टोलॉजी', 'कॅनिओफेशियल सर्जरी', 'स्पोर्ट्स डेन्टीस्ट्री' व 'स्किल डेव्हल्पमेंट लॅब' हे नवे विभाग व अभ्यासक्रम सुरू होणार होते. याचा फायदा रुग्णांसोबतच विद्यार्थ्यांना होणार होता.

सातवरून पाच मजल्यांची इमारत : 

डेंटलने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा इमारतीचा सात मजल्याचा प्रस्ताव तयार केला होता; परंतु, प्रशासकीय मंजुरी पाचच मजल्यांना देण्यात आली.