Sunil Kedar Tendernama
विदर्भ

Sunil Kedar : कोट्यवधींच्या NDCC बँक घोटाळ्यात सुनील केदार दोषी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार (Sunil Kedar) मुख्य आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (NDCC) कोट्यवधी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात केदार यांना शिक्षा सुनावण्यात आली. यात एकूण सहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली असून, इतर तीन आरोपी निर्दोष सुटले.

अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांनी हा निर्णय दिला. घोटाळा झाला त्यावेळी केदार बँकेचे अध्यक्ष होते. एकूण 11 पैकी 9 आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 406 (विश्वासघात), 409 (शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात), 468 (बनावट दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवज खरे भासविणे), 120-ब (कट रचणे) व 34 (समान उद्देश) हे दोषारोप निश्चित करून हा खटला चालविण्यात आला.

संबंधित आरोपींमध्ये सुनील केदार, बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य हिशेबनीस सुरेश दामोदर पेशकर (नागपूर), रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद), महेंद्र राधेश्याम अग्रवाल व श्रीप्रकाश शांतीलाल पोद्दार (कलकत्ता) यांचा समावेश आहे.

इतर दोन आरोपींपैकी रोखे दलाल संजय हरिराम अग्रवाल यांच्याविरुद्धच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तर कानन वसंत मेवावाला फरार आहे. केदारांकडून ऍड. देवेन चौहान यांनी युक्तिवाद केला. तर, राज्य शासनातर्फे नाशिकचे जिल्हा सरकारी वकील ऍड अजय मिसाळ यांनी बाजू मांडली.

तीन आरोपी निर्दोष

खटला चालविण्यात आलेल्या नऊ आरोपींपैकी केदार यांच्यासह आज एकूण आठ आरोपी न्यायालयात हजर होते. एक आरोपी नंदकिशोर त्रिवेदी वैद्यकीय कारणांमुळे उपस्थित राहू शकला नाही. तो व्हर्चुअल माध्यमातून उपस्थित होता. सुनील केदार यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठ, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी या आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच, महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार आणि सुरेश पेशकर या तीन आरोपींची निर्दोष सुटका झाली.

बँकेचे 150 कोटींचे नुकसान

होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चट्स प्रा. लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा. लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई यांच्याकडून 2001-2002 मध्ये बँकेच्या रकमेतून 150 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व बँकेची रक्कमही परत केली नाही, असा आरोप होता.

तर आमदारकी जाईल

लोकप्रतिनिधी कायद्यान्वये आमदार किंवा खासदारांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करण्यात येत. त्यामुळे, सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार असलेले केदार यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होईल. केवळ वरिष्ठ न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यास सदस्यत्व मिळू शकेल.