Nagpur Tendernama
विदर्भ

विदर्भात ७ मोठे उद्योग उभे होणार; ४ हजार ८०० रोजगार होणार उपलब्ध

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : स्वीत्झर्लंडमधील डाव्होस येथे पार पडलेल्या "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत विदर्भात सुमारे ३ हजार ५८७ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेले ७ मोठे उद्योग उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार झाले आहेत. या उद्योगांची उभारणी झाल्यास ४ हजार ८०० रोजगार उपलब्ध होतील.

हरित व नविनीकरण ऊर्जा क्षेत्रात पुढच्या ७ वर्षांसाठी ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा खात्रीशीर करार झाला असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. "इंडोरामा" ही कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्रात बुटीबोरी येथे ६०० कोटींचा नवा उद्योग प्रकल्प उभारणार आहे. त्यातून १५०० कुशल मनुष्यबळासाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

"जीआर कृष्णा फेरो अलॉईज लिमिटेड" ही दुसरी कंपनी पोलाद क्षेत्रात मूल, चंद्रपूरमध्ये ७४० कोटींचा उद्योग उभारणार असून तिथे ७०० कामगारांना रोजगार मिळणार आहे. "कलरशाईन इंडिया लिमिटेड " या तिसऱ्या कंपनीशी ५१० कोटी रुपयांच्या उमरेड येथील प्रस्तावित पोलाद प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पातून ५०० रोजगार निर्माण होतील. "कार्निव्हल इंडस्ट्रीज" ही चौथी कंपनी इथेनॉल इंधनाच्या क्षेत्रात मूल चंद्रपूर येथे २०७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून तिथे ५०० कामगारांना रोजगार मिळेल. "गोयल प्रोटीन्स लिमिटेड" या पाचव्या कंपनीत ऑईल निर्मितीमध्ये बुटीबोरी येथे ३८० कोटींची गुंतवणूक केली जाणार असून या उद्योगासाठी ५३४ मनुष्यबळ लागणार आहे. "अँप्रोस इंडस्ट्रीज लिमिटेड" कंपनीचा १५० कोटींचा सहावा वस्त्रोद्योग प्रकल्प अमरावतीमध्ये उभारला जाणार असून त्याठिकाणी ६०० जणांची रोजगार क्षमता निर्माण होणार आहे. तडाली, चंद्रपूर येथे इथेनॉल इंधनाचा सुमारे १ हजार कोटी गुंतवणुकीचा सातवा प्रकल्प होणार असून तिथे ६०० कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

याशिवाय हरित व नवीनीकरण ऊर्जा क्षेत्रात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची खात्रीशीर गुंतवणूक होणार असून संबंधित कंपनीकडून त्याबाबतचा प्रस्ताव मागविण्यात आला असल्याची माहितीही नितीन राऊत यांनी दिली. लॉजिस्टीक क्षेत्रात रिलायन्स कंपनीचे पार्क आले आहे. अदानी कंपनीने एक पार्क उभारला असून दुसऱ्या पार्कसाठी जागेचा शोध सुरू आहे. भाजीपाल्याच्या व्यापारासाठी रेल्वेच्या बोगीमध्ये "कोल्ड स्टोरेज" व्यवस्था केली जाणार असून पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी गोसीखुर्द धरणाचे पाणी बुलडाणा जिल्ह्यापर्यंत नेण्यात येणार आहे.