नागपूर (Nagpur) ः चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील एका शाळेच्या पटांगणातून रस्ता तयार करून तेथून कोळशाची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात शाळेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने केंद्रीय पर्यावण मंत्रालय, वेकोली यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे संस्कार भारती शाळेच्या संचालकांनी ही याचिका दाखल केली आहे. शाळेच्या जवळच कोळसा खाण आहे. येथून कोळशाची वाहतूक करण्यासाठी वेकोलि आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता तयार केला आहे. रस्ता तयार करताना मंजुरी घेण्यात आलेली नाही. तसेच कोळशाच्या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शाळेत एकण एक हजार विद्यार्थी आहेत.
१९९९ साली भूमिगत वाहिनीकरिता शाळेच्या पटांगणातील काही जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यानंतर हा प्रकल्पच रद्द झाला. आता त्याच जागेचा वापर बायपास रोड म्हणून केला जात आहे. वेकोलिच्या खाणीतून काढल्या जाणाऱ्या कोळशाची वाहतूक याच शाळेच्या पटांगणातून जाणाऱ्या रस्त्यावरून केली जात आहे. भूमिगत वाहिनीचा प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे अधिग्रहित परत करावी आणि शाळेच्या आवारातून होणारी काळशाची वाहतूक बंद करावी, अशी मागणी शाळेच्यावतीने करण्यात आली आहे. शाळेच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने संबंधित विभागाला नोटीस पाठविली आहे. १३ जून पर्यंत यावर प्रतिवादींना उत्तर देण्याचा आदेश न्यायाल्याने दिला आहे.