road Tendernama
विदर्भ

Gadchiroli : 24 कोटी रुपये मंजूर पण रस्त्याचे काम अजूनही...

टेंडरनामा ब्युरो

देसाईगंज (Desauganj) : देसाईगंज तालुक्यासह आरमोरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खडी उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळा तोंडावर असून, अद्यापही सदर रस्त्यांच्या बांधकामाचे भिजत घोंगडे अद्यापही कायमच असल्याने पावसाच्या पाण्याने बुजलेल्या खड्ड्यात जीव गेल्यावर रस्ते बनवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रस्त्यांच्या बांधकामासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी शासकीय स्तरावरून मंजूर करवून घेतलेल्या 24 कोटी रुपये किमतीच्या कामांवर प्रश्नचिन्ह लावल्या जाऊ लागले आहेत. रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन आवागमन करावे लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता आमदार गजबे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 31.14 किमीकरिता तब्बल 24 कोटी 1 लाख 2 हजार 300 रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला होता.

अलीकडे जवळपास सर्वच गावे बारमाही रस्त्याने जोडले गेले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जड वाहतुकीसह बारमाही वाहतूक, आवागमन केले जात आहे. मार्गांवर पडलेल्या भगदाडांमुळे अपघात घडून काही गंभीर तर काही किरकोळ अपघातांच्या घटना घडल्याचे वास्तव आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता आमदार गजबे यांनी या रस्त्यांच्या बांधकामासाठी 12 फेब्रुवारीला 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला. पावसाळा तोंडावर असून, अद्यापही कामे सुरूच करण्यात आली नसल्याने भर पावसात भगदाडांच्या विळख्यातून जीव मुठीत घेऊन आवागमन करावे लागणार आहे. एकूणच मंजूर 24 कोटी रुपये किमतीच्या रस्ता बांधकामावर प्रश्नचिन्ह लावल्या जाऊ लागले आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हे रस्ते मंजूर

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा- 3 अंतर्गत आरमोरी विधानसभा क्षेत्रात रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली होती. यात कुरखेडा तालुक्यातील कसारी- नवेझरी- अंगारा रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्याची लांबी 8.88 किमी, किंमत 6 कोटी 6 लाख 78 हजार 900 रुपये आहे. राष्ट्रीय महामार्ग 343 ते भटेगाव येडापूर येंगलखेडा ते सावरगाव मार्गाची लांबी 3.41 किमी व किंमत 2 कोटी 50 लक्ष 99 हजार 800 रुपये आहे. गुरनोली -गेवर्धा ते गोंदिया जिल्हा सीमेपर्यंतच्या मार्गाची लांबी- 4 किमी व किंमत 3 कोटी 32 लाख 91 हजार 600 रुपये आहे. देसाईगंज तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 353 - सी ते शिवराजपुर-फरी - किन्हाळा मार्गाची लांबी 9.05 किमी आहे, किंमत 7 कोटी 58 लाख 7 हजार रुपये आहे. आमगाव ते गांधीनगर रस्ता बांधकाम लांबी 5.800 किमी आहे. किंमत- 4 कोटी 52 लाख 25 हजार रुपये आहे. सर्वच कामांची लांबी 31.14 किमी आहे. त्यासाठी 24 कोटी 1 लाख 2 हजार 300 रुपये मंजूर झाले आहेत.