नागपूर : महापालिकेतील (Nagpur Municipal Corporation) स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती बघता चौकशीसाठी आता समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश एस. पी. मुळे यांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे समितीला मॅनेज करणे अवघड होणार असल्याने अधिकारी आणि कंत्राटदारही चांगलेच धास्तावले आहेत.
चौकशी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी सामान्य प्रशासन विभागाला घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, सदस्य विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ॲड. संजय बालपांडे, संदीप जाधव, सदस्या वैशाली नारनवरे, उपायुक्त निर्भय जैन, विधी अधिकारी सुरज पारोचे उपस्थित होते.
मनपाच्या विविध विभागात झालेली आर्थिक अनियमितता व कार्यपद्धतीतील भ्रष्ट आचरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश एस. पी. मुळे यांची नियुक्ती करण्याचे निर्णय घेण्यात आला. सत्र न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. पी. मुळे यांनी ग्राहक संरक्षण न्यायालयामध्ये काम केले आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार सुद्धा होते. त्यांना अनेक चौकशी समितीमध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.
मागील बैठकीत चौकशी समितीमार्फत पोलिस आयुक्तांना सर्व विभागांची चौकशी करण्यासाठी पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु पोलिस आयुक्तांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना टपाल मार्फत पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना समिती सदस्य प्रत्यक्ष भेटून निवेदन देतील, असे समितीचे अध्यक्ष सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सांगितले. विभागातर्फे समिती समोर ३ ऑडिटरच्या नावाचे प्रस्ताव ठेवण्यात आले. या तिघांशी समिती सदस्य संदीप जाधव चर्चा करून एकाला समितीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतील. समिती प्रमुख ठाकरे यांनी सामान्य प्रशासन विभागला कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. मूळ कागदपत्रे पोलिसांकडे असल्यास त्याची सत्यप्रत समितीपुढे सादर करण्यात यावी, असेही निर्देश त्यांंनी दिले.