नागपूर (Nagpur) : रिन्यू पॉवर कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरमध्ये सुमारे 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. आताच रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला असून या प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.
सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या सामंजस्य करारावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभाग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा. लि. यांच्यावतीने डॉ. अमित पैठणकर उपस्थित होते. राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. राज्यात अनेक मोठे प्रकल्प येत आहेत.
10 हजार रोजगार निर्मिती
10 गिगावॅट मेटाल्युर्जिकल ग्रेड सिलिका, 10 गिगावॅट पॉलिसिलीकॉन, 6 गिगावॅट इनगॉट / वेफर निर्मिती सुविधा आणि 1 गिगावॅट मॉड्युल निर्मितीची सुविधा नवीकरणीय ऊर्जा ब्लॉकसह एकात्मिक प्रकल्प स्थापित करणार आहे. हा प्रकल्प सुमारे 500 एकर जागेवर स्थापित होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे आठ ते दहा हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित उद्योगांच्या माध्यमातून दोन हजार कोटींची अतिरिक्त गुंतवणूकही होणार आहे.
त्याचप्रमाणे इथे आलेले अनेक प्रकल्प अल्पावधीतच मोठे झाले आहेत. कारण उद्योग वाढीसाठी लागणारे पूरक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. रिन्यू पॉवर कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प हा नागपुरात येत असल्याने विशेष सहकार्य करण्यात येईल असेही याप्रसंगी फडणवीस म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या प्रयत्नाने होत असलेल्या या सामंजस्य कराराचे स्वागत केले. या सामजस्य कराराच्या माध्यमातून नविनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. या कराराच्या माध्यमातून राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीबाबत प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी माहिती दिली.