Nagar Beed Parali Railway Tendernama
विदर्भ

हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील 'या' स्टेशनवर सोयीसुविधांचा अभाव

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील सालेकसा रेल्वे स्थानक मागील अनेक वर्षांपासून सोयीसुविधांपासून वंचित आहे. परिणामी रेल्वे स्थानक आपल्या दुर्दशेवर अश्रू गाळत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे रेल्वे प्रवाशांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

सालेकसा तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्य लागून असल्याने या रेल्वे स्थानकाचा उपयोग तालुक्यातील प्रवाशांसह या दोन राज्यातील प्रवासी देखील घेतात. तहसील कार्यालयासह तालुका स्तरावरील विविध प्रकारची सर्व कार्यालये सालेकसा येथे असल्याने दररोज कर्मचारी आणि इतर प्रवासी, नियमित प्रवासी या रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. परंतु सालेकसा रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोयीसुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे.

रात्रीच्यावेळी प्रवासी असुरक्षित

सालेकसा हा नक्षलग्रस्त तालुका असून रेल्वे स्टेशनच्या अवघ्या काही अंतरावर घनदाट जंगल आहे. तर दुसरीकडे रेल्वे स्थानकावर सुरक्षित प्रतीक्षालय नाही अन् रेल्वे स्टेशन परिसराला सुरक्षा नाही. अशात रात्री-बेरात्री रेल्वेतुन उतरल्यावर एकतर आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचणे कठीण असते. तर रेल्वे स्थानकावर निवांतपणे झोपणे त्यापेक्षा कठीण आहे. येथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. रात्री उशिरा गाडी पोहोचली की प्रवाशांचा जीव टांगणीला असतो.

दोन एक्स्प्रेस गाड्या थांबतात; पण फलाट धोक्याचे :

सर्वांत जास्त व्यस्त रेल्वे मार्गापैकी एक असलेल्या मुंबई- हावडा रेल्वे मार्गावरील सालेकसा रेल्वे स्थानकाला जवळपास दीडशे वर्षे झाली आहेत. या मार्गावरून सर्व प्रकारच्या धावतात. छोट्या रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या सुद्धा जातात. सालेकसा रेल्वे स्थानकावर सर्व पॅसेंजर गाड्या तर हावडा- कुर्ला शालीमार एक्स्प्रेस आणि बिलासपूर-अमृ तसर छत्तीसगड एक्स्प्रेस या दोनच एक्स्प्रेस गाड्या थांबतात. सालेकसा रेल्वे स्थानक हावडा-मुंबई मार्गावर आहे. परंतु रेल्वेस्थानक नेहमीच उपेक्षित राहिले आहे. जबाबदार लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे कधीच लक्ष दिले नाही. हे या रेल्वे स्थानक व प्रवाशांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. असे विचार सालेकसाचे सामाजिक कार्यकर्ता सुनील असाटी यांनी व्यक्त केले.