Bridge Tendernama
विदर्भ

Chandrapur : 'या' रेल्वे उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्यात; डिसेंबरमध्ये काम पूर्ण करण्याचा दावा

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : महारेलद्वारे वरोरा (एलसी 27) जवळील जीएमआर पॉवर प्लॉन्टला जोडणाऱ्या एमआयडीसी रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती आली. सध्या 80 टक्के काम झाले. उर्वरित बांधकाम लवकरच पूर्ण होणार असून पुलाचे सौंदर्य वाढविण्यासाठी फोर कोट इपॉक्सी पेंटिंग सिस्टिम वापरण्यात येईल, अशी माहिती महारेलने दिली.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) हा महाराष्ट्र शासन व आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे. रेल्वेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे, प्रकल्पांची क्षमता वाढविणे व नवीन रेल्वे प्रकल्पांची व्यवहार्यता तपासून निर्माण करण्याचे काम महारेल करते. रेल्वे फाटकाने वाहतूक कोंडीबरोबरच अपघात होण्याचा धोका उद्भवतो. रेल्वे फाटकांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी बंद करण्यावर भर देत आहे. उड्डाणपूल पूर्ण झाल्यास वरोरा येथील नागरिकांना विनाअडथळा वाहतूक करता येईल. शिवाय दोन वीज प्रकल्पांच्या दिशेने अवजड वाहतूक सुरळीत होणार आहे.

वाहतुकीसाठी दोन मार्गिका :

चंद्रपूर जिल्ह्यात मध्य रेल्वेच्या नागपूर-बल्लारशाह विभागातील वरोरा ते हिंगणघाट रेल्वे स्थानकादरम्यान एलसी 27 येथे महारेल उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. या उड्डाणपुलाची लांबी 553 मीटर असून दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी दोन मार्गिका आहेत. उड्डाणपुलाची किमत 46 कोटी आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. उड्डाणपुलाचे सुमारे 80 टक्के बांधकाम पूर्ण झाले. उड्डाणपूल डिसेंबर 2023 च्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एलईडी सजावटीने पूल उजळणार :

बांधकाम कामांचे नियोजन व रेखाचित्रण, डिझाइनसाठी इन-हाउस समर्पित टीम तयार केल्याने महारेल फास्टरॅकवर काम पूर्ण करत आहे. रोड ओवर ब्रिजचे कार्य पूर्ण करण्यासाठी महारेलने डीएसएम (डिजिटल सरफेस मॉडेल) आणि डीईएम (डिजिटल एलिव्हेशन मॉडेल) तयार केले.  बांधकामासाठी 51.5 मीटर लांबीचे 04 स्टील गर्डर प्रक्षेपण 2 दिवसांत पूर्ण केले. रात्रीच्या हा उड्डाणपूल एलईडी पथदिवे व रिमोट कंट्रोल थीमवर आधारित एलईडी सजावटीने उजळून निघेल, असा दावा महारेलने केला आहे.