PWD Tendernama
विदर्भ

PWD : 600 कोटी मिळाले नाही तर कंत्राटदार करणार आंदोलन

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : अमरावती जिल्ह्यात अनेक लहान-मोठ्या कंत्राटदाराने विविध ठिकाणी छोटे-मोठे बांधकाम केलेत, मात्र काही कंत्राटदारांना अद्यापही निधी न मिळाल्याची बाब समोर आली आहे. पीडब्ल्यूडीकडे 6 महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यातील लहान-मोठ्या कंत्राटदारांची अनेक विकासकामांच्या देयकांपोटी तब्बल सहाशे कोटी रक्कम थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. थकीत रकमेच्या कमितकमी 40 ते 50 टक्के रक्कम मिळावी, अशी मागणी अनेक कंत्राटदारांनी केली आहे.

राज्यातील पीडब्ल्यूडी विभागाने यावर्षी बजेट केवळ 18 हजार कोटींची तरतूद असताना जवळपास 64 हजार कोटींची कामे 17 मार्च 2024 पर्यंत मंजुरी देत त्यांच्या निविदासुद्धा पूर्ण केल्या आहेत. या प्रमुख कामांमध्ये जिल्हा, राज्य व ग्रामीण मार्गाची दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे सोबतच रस्त्यावरील खड्डे भरणे, प्रमुख शहर व तालुका, ग्रामीण भागामधील इमारती दुरुस्ती व देखभाल दुरुस्ती या सर्व कामांचा समावेश आहे. वास्तविक सन 2024-24 च्या बजेट मध्ये एवढ्या कमी रकमेची तरतूद असताना पाच पटीने कामे मंजूर करण्यात आली आहेत. प्रलंबित देयकांची रक्कम लवकर मिळावी, अन्यथाा आंदोलन करू असा इशारा निवेदनातून पीडब्ल्यूडीच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला आहे. 

सार्वजनिक बांधकामचा अमरावती आणि अचलपूर विभाग तसेच विशेष प्रकल्प दर्यापूर व अमरावती अशी मिळून सुमारे जिल्हाभरातील सहाशे कोटींची रक्कम देयकांची थकीत आकडेवारी आहे. सहा महिन्यांपासून एकही पैसा मिळाला नाही. त्यामुळे पीडब्ल्यूडी विभागात कामे करणारे लहान-मोठे कंत्राटदार त्रासुन गेले आहेत. शासनाकडून निधी आला नसल्याचे उत्तर दिले जाते. परंतु, बँकेकडून कर्ज घेतले, व्याज भरायलासुद्धा पैसे नाही, असा त्रास कंत्राटदारांना होत आहे. येत्या आठ दिवसात कंत्राटदारांची थकीत देयके अदा करण्याबाबत पीडब्ल्यूडी व अर्थ खात्याने निर्णय न घेतल्यास राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेद्वारे प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्रामीण भागात लक्षवेधी आंदोलन करण्याची माहिती जिल्हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता अध्यक्ष अश्विन पवार यांनी दिली. राज्यात 20 हजार कोटी रुपये कंत्राटदारांची देयकांची रक्कम थकीत आहे.