Potholes (File) Tendernama
विदर्भ

रस्त्यातले खड्डे खोल खोल, लोकांचा जीव माती मोल!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महिनाभराचा पावसाने शहरातील सर्वच भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले असून काही रस्त्यांवर बारिक खडी पसरली आहे. परिणामी या रस्त्यांवरून दुचाकीने प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्ते वाहून गेल्याने ठेकेदारांच्या कामच्या गुणवत्तेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत.

पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. दक्षिण, उत्तर, पूर्व, दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपुरातील अनेक डांबरी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. शहरातील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी रस्ता, मानेवाडा चौक ते बेसा नाला, सिव्हिल लाईनमधील प्रेस क्लबसमोरील रस्ता तसेच उत्तर नागपुरातील यादवनगर, पश्चिम नागपुरातील उत्कर्षनगर, फ्रेन्डस कॉलनी, वीरचक्र कॉलनी, मनोहर विहार परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यांवरून ये-जा करताना नागरिकांवर अपघाताची टांगती तलवार आहे. हे सर्व रस्ते वर्दळीचे असून दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांची रेलचेल असते. अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले असून घरातून निघताच नागरिकांना वस्तीतील खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागत आहे. त्यानंतर प्रमुख रस्त्यांवरून पाठीच्या कणा मोडित गंतव्य ठिकाणापर्यंत प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यातून जाताना अपघात होत असून पालिका प्रशासन कुठल्याही हालचाली करीत नसल्याने प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. यातील काही रस्त्यांचे मागील वर्षी डांबरीकरण करण्यात आले. सिव्हिल लाईनमधील रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले. परंतु वर्ष, काही महिन्यांमध्येच पावसाने रस्त्यांच्या कामाचे पितळ उघडे पाडले.

सिटीझन फोरमने वेधले लक्ष
नागपूर सिटीझन फोरमने आज उत्तर नागपुरातील भागात रस्त्यांची पाहणी केली. ‘खड्डे दाखवा, झोपेतून जागवा’ या अभियानांतर्गत अमित बांदुरकर यांनी उत्तर नागपूर तर पश्चिम नागपुरात अभिजित झा यांनी महापालिकेचे लक्ष वेधले. पश्चिम नागपुरातील फ्रेन्डस कॉलनी, उत्कर्षनगर येथे मागील वर्षी डांबरीकरण करण्यात आले होते. एका पावसात रस्त्यांची दुर्दशा झाली.