Road Tendernama
विदर्भ

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते; कंत्राटदाराचा शोध सुरु

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : रामटेक तालुक्यातील नगरधन गावापासुन गेलेला नगरधन ते कांद्री (कन्हान) मार्गाची मोठी दुरावस्था झालेली असून, रस्ता जागोजागी उखडलेला आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळेनासे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तयार केला असून, कंत्राटदाराचा शोध घेतला जात आहे.

नगरधन ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत कामडी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सदर रस्त्याच्या बांधकामाची मागणी रेटून धरली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नगरधन ते कांद्री (कन्हान) हा १४ किमी अंतराचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असून अनेक वर्षापासून उखडलेल्या अवस्थेत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे व गिट्टीच दिसून येते. त्यामुळे या रस्त्यावरुन रहदारी करताना मोठी पंचाईत होत असते. विशेष म्हणजे रामटेक हे राममंदिर, पर्यटन क्षेत्र तसेच नगरधन येथील पुरातनकालीन किल्ला यासर्व बाबींमुळे दुरवर ख्यातनाम आहे.

या भागात दररोज शेकडो लोक हजेरी लावत असतात. कांद्री (कन्हान) कडून नगरधनकडे यायचे असल्यास हा मार्ग म्हणजे एक "शार्टकट" मार्ग ठरत असतो. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्यामुळे पर्यटकांना फेरा मारुन मनसर मार्गे जाणे येणे करावे लागते. तर रामटेक परिसरातील नागरिकांना कामठी किंवा नागपूर येथे शासकीय कामे किंवा आरोग्य तपासणी व उपचारासाठी हाच मार्ग अत्यंत सोयीचा आहे. पण पर्याय नसल्यामुळे नागरिकांना १४ किलोमीटर ऐवजी ३० किमी लांबच्या मार्गाने उशिरा पोहोचावे लागते. परिणामी हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे व इंधन दरवाढ खूप वाढल्याने पर्यटकांची रहदारी सुध्दा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्याचे ताबडतोब बांधकाम सुरू करावे अन्यथा जर पावसाळ्यापुर्वी या रस्त्याचे बांधकाम झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरधनचे सरपंच प्रशांत देविदास कामडी यासह नागरिकांनी दिला आहे.