Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nagpur : गडकरीजी अजबच! वाहतूक सुरू होताच सिमेंट रस्त्यावर खड्डे

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात अवघ्या दोन महिन्यांतच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

उपराजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नागपूर बाह्यवळण मार्गाचे काम सध्या गतीने सुरू आहे. नागपूर-वर्धा मार्गावरून याच रस्त्याने ५ किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गाचा 'झिरो पॉइंट' आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने काही दिवसांआधीच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या सिमेंटिकरणाच्या कामाला सुरुवात केल्या गेली. मात्र वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर चक्क मोठमोठे खड्डे पडायला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

महिनोमहिने बनत असलेल्या या रस्त्यांचे आयुष्य किमान पन्नास वर्षे राहील, असा दावा करण्यात येत असताना अवघ्या एक-दोन महिन्यांतच खड्डे पडल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता किती काळ टिकेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.आधीच रस्ते बांधकामामुळे नागरिकांना जिवावर उदार होऊन रस्त्यांवरून वाहने चालवावी लागत आहेत. त्यातच रस्त्यांची कामे अशा पद्धतीने होत असतील तर कोट्यवधी रुपये खर्च करून फायदा काय, असा सवाल आता सर्वच स्तरातून करण्यात येत आहे.

रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याची गरज
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, काही रस्त्यांना काही दिवसातच भेगा पडत असून यामुळे दुचाकीचे अपघात होत आहेत. आतापर्यंत अनेक अपघात झाले असून यावर लक्ष देणे गरजेचे आहे. वेळीच रस्त्याची गुणवत्ता तपासली तर होणारे अपघात टाळता येतील. त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी होत आहे.