Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

गडकरीसाहेब हे कसले काम? दीड वर्षातच 'या' नवीन पुलाचे लोखंडी बार बाहेर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी मार्गावरील कन्हान-कामठी दरम्यान कन्हान नदीवर 50.63 कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या पुलामुळे अल्पावधीतच अनेक समस्या निर्माण होत आहेत. या पुलाचे उद्घाटन 2023 मध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर तब्बल 8 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर त्याचे बांधकाम पूर्ण झाले. आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या या पुलामध्ये दीड वर्षाच्या अल्पावधीतच पुलाच्या स्लॅबमध्ये खड्डे निर्माण झाले असून लोखंडी सळ्या बाहेर पडू लागल्याने पुलावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे. 

पुलाच्या स्लॅबच्या मध्यवर्ती भागावरील सिमेंट काँक्रीटची झीज झाली आहे. काही ठिकाणी बार बाहेर पडत आहेत आणि हळूहळू पसरत आहेत. दिवसा या निघालेल्या सळ्या टाळून वाहने जातात, मात्र रात्रीच्या गडद अंधारात यावरून वाहने जात आहेत, ही धोक्याची घंटा आहे. केंद्र सरकारने बांधलेल्या या राष्ट्रीय पुलाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक महिन्यांपासून हा पूल अंधारात आहे. एकूणच परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पावसाला सुरूवात होताच पुलावरील स्लॅबचे सिमेंट निघून जागोजागी खड्डे पडायला प्रारंभ होते. पाऊसाच्या पहिले दुरुस्ती केली गेली नाही तर आणखी दुरावस्था होईल. आणि पुढे काय होईल याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे जुन्या ब्रिटिशकालीन पुलाप्रमाणे नवीन पुलावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावर 4-5 खड्डे तयार झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. अनुचित घटना घडू नये म्हणून पुलावरील खड्डे तातडीने बुजवून वाळू व माती काढून टाकण्याची गरज आहे. संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

गडकरींनी केले होते उद्घाटन : 

कन्हान नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाचा पर्याय म्हणून 50.63 कोटी रुपये खर्च करून नवीन पूल तयार करण्यात आला. परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते 1 सप्टेंबरला पुलाचे लोकार्पण झाले. पण या पुलावर जीवघेणे खड्डे पडले असून आतील लोखंडी सळाखी बाहेर दिसत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याकडे केंद्रीय मंत्री गडकरी कधी लक्ष देतील ? जर इतक्या कमी वेळात पुलाची याप्रकारे दुरावस्था होत असेल तर काम किती निकृष्ट दर्ज्याचे आहे , हे यावरून लक्षात येते.